भिगवण (पुणे) : भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्रारवाडी गावच्या हद्दीत धारदार शस्त्राने तुकडे करून पिशवीत भरलेल्या अवस्थेत मृतदेह उजनीच्या पाण्यात आढळून आल्याने खळबळ माजली. मासे वाहून नेण्याच्या प्लास्टिक पिशवीत धड आणि हातपायाचे ५ तुकडे सापडले. भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उजनीच्या फुगवट्या शेजारी प्लास्टिक पिशवीत हा मृतदेह आढळून आला आहे. यात पुरुष जातीच्या शरीराचे हात पाय आणि धड असे ५ तुकडे आढळून आले. तर यात मुंडके मात्र आढळून आले नाही. याबाबत भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला. ३० ते ३५ वर्ष वयाच्या पुरुषाचा मृतदेह असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली.
अज्ञात ठिकाणी खून करून त्याच्या शरीराचे ५ तुकडे करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र मृतदेहाचे मुंडके यात आढळून आलेले नाही. त्यामुळे सदर खून इतर ठिकाणी करून उजनीच्या पाण्यात मृतदेह टाकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात तक्रारवाडी गावचे पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरु करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
अत्यंत निर्दयीपणे मृतदेहाचे तुकडे केले असून मांडी पासून पायाचे तर खांद्यापासून हाताचे दोन तुकडे केले आहेत. मुंडके मानेतून कापण्यात आले असल्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी घटनास्थळी भेट देत गुन्ह्याची माहिती घेतली.
या अगोदरही महिलेच्या शरीराचे ९ तुकडे आढळले होते- बाहेरगावी खून करून मृतदेह भिगवण येथील उजनीच्या पाण्यात टाकण्याची ही तिसरी वेळ आहे. या अगोदर एका महिलेच्या शरीराचे ९ तुकडे करून टाकल्याची घटना घडली होती. भिगवण पोलिसांनी जंग जंग पछाडून तपास करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या गुन्ह्याचा उकल होवू शकला नाही. त्यामुळे या खुनाचा तपास हे पोलीसासमोरील आव्हान असल्याचे दिसून येत आहे. मात्र भिगवण पोलीस गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत आरोपींच्या मुसक्या आवाळतील असा विस्वास व्यक्त केला जात आहे.