पुणे/ धनकवडी : माेक्काच्या गुन्हयात फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता अणि बांधकाम व्यवसायिक रविंद्र बऱ्हाटे याच्या ५ मालमत्ता जप्तीची कारवाई आज सुरु करण्यात आली. हवेलीचे निवासी तहसिलदार अजय गेंगाणे, मंडल अधिकारी सूर्यकांत पाटील, तलाठी सूर्यकांत काळे, यांनी ही कारवाई केली. यावेळी कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी बाळासाहेब बडे, कात्रज चे तलाठी विकास फुके उपस्थित होते. दुपारी १२ वाजता सुरु झालेली ही कारवाई सुमारे १ तास सुरु होती.
बऱ्हाटेच्या धनकवडीतील सरगम सोसायटी येथील मालमत्ता जप्त करण्यात आली. महसुल अधिकाऱ्यांनी त्याच्या मालमत्तेला सील ठोकले.
बऱ्हाटे याच्यावर सुरुवातीला काेथरुड पाेलीस ठाण्यात बांधकाम व्यवसायिक सुधीर कर्नाटकी यांनी फिर्याद दिल्यानंतर दडपशाहीने जागा बळकवणे,शस्त्राचा धाक दाखवणे, खंडणी वसूल करणे, फसवणुक करणे आदी कलमांखाली बऱ्हाटेवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुण्यातील विविध पाेलीस ठाण्यात आतापर्यंत एकूण १२ गुन्हे बऱ्हाटे याच्यासह साथीदारांवर दाखल आहे. काेंढव्यातील लुल्लानगर येथील मधुसुधा अर्पाटमेंट येथील दाेन फ्लॅट,धनकवडीतील तळजाई पठार येथील सरगम साेसायटीतील माेकळा प्लाॅट, सरगम साेसायटील एक बंगला व कात्रज भागातील भागीदारीतील जमीन मिळकत अशा ५ मालमत्ता महसुल विभागाने जप्त करुन त्यांना सील ठोकले.
............
न्यायालयाने आदेश दिल्यानुसार हवेली तालुक्यातील रविंद्र बराटे यांच्या मालकीच्या सर्व मालमत्ता शोधून काढली. त्यानंतर नायब तहसीलदार, संबंधित सर्कल अधिकारी व स्थानिक तलाढ्यांनी बुधवार (दि.24) रोजी ही सर्व मालमत्ता सिली केली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
सचिन बारावकर, हवेली प्रांत अधिकारी
...........
जप्त केलेली मालमत्ता
हवेली तालुक्यातील लुल्लानगर येथील मधुसुधा अपार्टमेंटमधील तळमजला (१२७८स्क्वेअरफुट) व फ्लॅट (९९.७५ स्क्वेअर फुट)
धनकवडी येथील सर्वे नं. ८ मधील २३१७ चौरस फुट,
तळजाई पठार, सरगम सोसायटीतील २३१७ चौरस फुट
सिटी सर्वे न. १९४९ मधील सिद्धीविनायक अपार्टमेंट नं २मधील तळमजल्यावरील दुकान नं. १ (३३७ चौरस फुट), दुकानास लागून असलेले स्टिल्ट फ्लोअर स्टोअरचे क्षेत्र २५० चौरस फुट व दुकानामागील गोडाऊनचे क्षेत्र १४९ चौरसफुट
हवेली क्र. २ मधील नवी सर्वे नं. ८३ मधील १४ आर