लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नव्या कोरोनाबाधितांसाठी गृह विलगीकरण पूर्णत: बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये आजमितीला साधारणत: दहा हजार कोरोनाबाधितांचे विलगीकरण होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले. शहरातील सक्रिय रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने सध्या केवळ ५ हजार ५४ कोरोनाबाधित गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) असल्याचे सांगण्यात आले.
शहरात आजमितीला ८ हजार ८६८ कोरोनाबाधितांपैकी ५ हजार ५४ रुग्ण गृह विलगीकरणात असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. महापालिकेची सहा कोविड केअर सेंटर चालू असून केवळ ४५५ कोरोनाबाधित विलगीकरणात आहेत़
रक्षकनगर खराडी, येरवड्यातील संत ज्ञानेश्वर सभागृह, बनकर शाळा हडपसर, गंगाधाम, एसएनडीटी व औंध आयटीआय अशा सहा ठिकाणी कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. या सहाही ठिकाणी २ हजार ३०७ रुग्णांना विलग ठेवण्याची क्षमता आहे़ तर बालेवाडी स्टेडियम, कृषी महाविद्यालय आदी ठिकाणी आणखी २ हजार ४०० रुग्ण विलग ठेवता येईल एवढे दोन कोविड सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद आहेत.
याचबरोबर महापालिकेने संभाव्य रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच आणखी दहा इमारती ताब्यात घेऊन येथे ४ हजार २०० कोरोनाबाधितांची विलगीकरणाची सोय करता येईल अशी व्यवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे दहा हजारांपर्यंत कोरोनाबाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्याची क्षमता महापालिकेने तयार ठेवली आहे. खासगी कोविड केअर सेंटरची संख्याही तीसपेक्षा जास्त असून या ठिकाणी साधारणत: तीन हजार रुग्णांचे विलगीकरण शक्य आहे.
चौकट
महापालिकेला लेखी आदेश अद्याप नाहीत
“शहरातील कोरोनाबाधितांचे गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केला असला तरी याबाबतचे लेखी आदेश महापालिकेला अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे हे आदेश आल्यावर, त्यातील अटी व नियम पाहून पुढील कार्यवाही केली जाईल.” -विक्रम कुमार, महापालिका आयुक्त.
-----------------------