लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : एक वर्षांपूर्वी बेदरकारपणे कार चालवून सहा महिन्यांच्या चिमुकलीसह दोघांच्या मृत्यूस आणि तिघांना जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकास ५ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. उद्धव नामदेव शिंदे (वय ६0, रा. पिंपळे गुरव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील संजय पवार यांनी ८ साक्षीदार तपासले. शिंदे याच्यासोबत गाडीमध्ये असलेल्या त्याच्या मित्राची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली. पिंपळे गुरव हद्दीतील जगताप पेट्रोलपंप ते सुदर्शन चौक या दरम्यान १९ जानेवारी २0१५ रोजी रात्री ९ ते ९.१५ च्या सुमारास ही घटना घडली. कारची धडक बसल्याने दुचाकीस्वार हेमकांत रामदास दिघे (वय ४७, रा. रहाटणी) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कारने रिक्षाला धडक दिली. त्यामध्ये चंद्र्रकांत झिरगे (वय ४८, रा. रहाटणी) हे जखमी झाले होते. सांगवी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिंदे याला शिक्षा सुनावली.
दोघांच्या मृत्यूप्रकरणी ५ वर्षांची सक्तमजुरी
By admin | Published: July 08, 2017 2:35 AM