लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील परिवहन वाहनांना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीसाठी वार्षिक करातून ५० टक्के सुट दिली आहे. त्यासाठी वाहतूकदारांना ३१ मार्च २०२० पर्यंतचा थकित असलेला कर दंड व्याजासह भरावा लागणार आहे. थकित कर भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या निर्णयाचे वाहतूकदार संघटनांनी स्वागत केले आहे.
लॉकडाऊन काळात राज्यातील वाहतुक ठप्प होती. त्यामुळे वाहतूकदारांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे या कालावधीतील वाहनांच्या वार्षिक करातून सूट देण्याची माहिती संघटनांनी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने काही दिवसांपुर्वी याबाबतचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय घेताना लॉकडाऊन कालावधीत कर भरणाऱ्या वाहतुकदारांना वगळले होते. प्रामाणिकपणे कर भरूनही सवलतीचा लाभ मिळणार नसल्याने वाहतुकदारांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. याचा विचार करून शासनाने नुकताच सर्व वाहतूकदारांना करातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
परिवहन विभागाकडून याबाबत सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, मालवाहतुक करणारी वाहने, प्रवासी वाहने, खासगी सेवा वाहने, खनित्रे, व्यावसायिक कँपर्स व्हॅन, शालेय विद्यार्थी बस आदी वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत वाहतुकदारांना १०० टक्के सुट जाहीर केली आहे. म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च २०२१ या कालावधीसाठी एकूण वार्षिक कराच्या ५० टक्के सुट दिली आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत कर भरलेल्या वाहनांनाच हा फायदा मिळणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यानचा कर भरलेला असल्यास तो पुढील कालावधीसाठीच्या देय करात समायोजित करण्यात आला आहे. त्यानुसार वाहन प्रणालीमध्ये बदल केले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालय स्तरावर ही सवलत देण्यात यावी, अशा सुचना परिवहन आयुक्तांनी दिल्या आहेत.