पुणे: मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी ५० बायकँट यंत्र भेट देण्यात आली. जो रूग्ण फारसा गंभीर नाही, पण त्याला व्हेंटिलेटर लागू शकतो, त्याच्यासाठी हे यंत्र काही काळ उपयोगी पडेल.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या संस्थेचे महासंचालक प्रशांत गिरवणे यांनी ही यंत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शुक्रवारी सकाळी कौन्सिल हॉल आवारात सुपूर्द केली. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते.
ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांच्या सध्या असलेल्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर ही यंत्र उपयुक्त आहेत असे गिरवणे यांंनी सांगितले. पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड महापालिकेलाही अशी यंत्र देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पवार यांनी यावेळी अनेक शंका विचारून निरसन करून घेतले. ग्रामीण भागात वीज जाते अशा वेळी यंत्र चालेला का, त्यात लिक्विड ऑक्सिजन भरावा लागतो का अशी विचारणा त्यांनी केली. यंत्र हवेतील ऑक्सिजन खेचून घेते, वेगळा पुरवठा करावा लागत नाही, वीज पुरवठा खंडीत झाला तरीही ते काम करते अशी माहिती गिरवणे यांंनी त्यांना दिली.
आमदार सुनिल टिंगरे यांची रूग्णवाहिका, ऊरळी कांचन ग्रामपंचायतीची शववाहिका यांचेही लोकार्पण पवार यांच्या हस्ते झाले. नगरसेवक सचिन दोडके यांनी वारजे माळवाडीत केलेल्या आरोग्य सुविधांचे पवार यांनी ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केले.