पुणे : यंदा तब्बल १७० पथकांतील सुमारे २२ हजार वादक गणेशोत्सवात शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होणार असून गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये ५० ढोल, १५ ताशे व ध्वज पथकासह एकूण १५० ते २०० वादकांचा सहभाग राहणार आहे, अशी भूमिका ढोल ताशा महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत मांडली. मंडळांना चौकांमध्ये ठराविक वेळ देण्यात येईल, तेवढ्या वेळेत आम्ही वाजवू आणि पुढे सरकू, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला महासंघाचे विलास शिगवण, संजय सातपुते, प्रकाश राऊत, अॅड. शिरीष थिटे, अनुप साठ्ये, आशुतोष देशपांडे, उमेश आगाशे, ओंकार कलढोणकर आदी उपस्थित होते.
पुणे शहरातील गणेशोत्सवात, गणेश अगमन व विसर्जन दिवशी सर्व ढोल ताशा व ध्वज पथके मिरवणुकांमध्ये सहभागी होणार आहेत. उत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण असलेली विसर्जन मिरवणूक वेळेत संपावी, यासाठी सर्व ढोल ताशा व ध्वज पथके प्रयत्न करतील आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य गणेश मंडळे व पोलिस प्रशासनाला करतील.
केवळ लक्ष्मी रस्ताच नाही, तर केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता टिळक रस्ता, कर्वे रस्ता अशा सर्वच प्रमुख विसर्जन मार्गांवरून ढोल ताशा पथक सहभागी होणार आहेत. सुरक्षा आणि शिस्त याकरिता पथकांच्या अग्रभागी बॅनर ठेवून प्रत्येक वादकाच्या गळ्यात पथकाचे ओळखपत्र असेल. कोणतेही पथक टोल वादन करणार नाही, त्याऐवजी झांजांचा समावेश करतील, याकडे लक्ष दिले जाईल. तसेच, गणेश मंडळे व पोलीस प्रशासन यांच्याबरोबर महासंघ पदाधिकारी व स्वयंसेवक, विसर्जन मिरवणुकीत समन्वय राखण्यास प्रयत्नशील असतील. सर्व पथके समाधान चौक अथवा बाबू गेनू चौक येथून मिरवणुकीत सहभागी होतील व टिळक (अलका टॉकीज) चौक अथवा खंडुजीबाबा चौक पर्यंत मिरवणुकीत सहभागी राहतील.