डमी स्टार 845
बहुतांश आगारात मुक्कामी एसटी नाहीच, सासवड, दौंड, शिरूर आगारातील प्रवासी एसटीपासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात एसटीची प्रवासी सेवा सुरू झाली असली, तरी अद्याप ५० टक्के एसटी गाड्या आगारातच उभ्या आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने या बस आगारात ठेवल्या असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात धावणाऱ्या खासगी गाड्यांना मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावात एसटी येत नसल्याने ‘वडाप’चा व्यवसाय मात्र जोरात सुरू आहे.
पुणे विभागात स्वारगेट, वाकडेवाडी, इंदापूर, आदी प्रमुख आगरांच्या बहुतांश बस उभ्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागात वाहतूक करणाऱ्या सासवड, शिरूर व दौंड आगाराच्या गाड्यांची सेवा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.
---------------------
पुणे विभागात एकूण बस : एक हजार
सध्या सुरू असलेले बस : ५१८
आगारात उभ्या असलेल्या बस : ४८२
----------------------------------
एकूण कर्मचारी : ४५००
कामावर चालक : ८००
कामावर वाहक : ६००
एकूण चालक : १८००
एकूण वाहक : १६००
----------------------
या गावांना एसटी कधी येणार :
सासवड आगारात १५, शिरूर आगारात २१,दौंड आगारात १२ गावांच्या मुक्कामी एसटी बंद आहेत. शिवाय अन्य आगारात देखील थोड्या फार प्रमाणात ग्रामीण भागातील एसटी सेवा बंद आहे.यात प्रामुख्याने नीरा, जेजुरी, वीर, इनामगाव, ओझर, शिंदोडी आदी गावांचा समावेश आहे.
-------------------------
प्रवाशांना वडापचा आधार :
पुणे जिल्ह्यातील जवळपास ७० गावांना वडापचा आधार आहे. यात काळीपिवळी, सिक्ससीटर आदी वाहनातून मोठ्या प्रमाणात खासगी वाहतूक होते.
----------------------
प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मुक्कामी एसटीसेवा बंद आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. परंतु अडचणीत असणाऱ्या एसटीला सर्वांनीच हातभार लावणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना खासगीऐवजी एसटी बसनेच प्रवास करण्याचे आवाहन करावे.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना, पुणे.
-------------