बारामती : एकीकडे जलजागृतीच्या माध्यमातून पाणी बचतीची मोहीम राबविली जात असताना धरणातून सोडलेले पाण्याचे शेवटपर्यंत पोहोचेपर्यंत ५० टक्के गळती होत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. यामध्ये पाणी चोरीसह कालव्याची नादुरुस्ती, बाष्पीभवनामुळे ‘पाण्याच्या बचती’लाच ‘खो’ घातला जात आहे. नीरा डावा कालवा, उजवा कालवा, खडकवासला यांचे धरणापासूनचे अंतर किमान १२० ते १५० किलोमीटर इतके आहे. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळेदेखील पाण्याची हानी होते. मात्र, पुढे धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडल्यानंतर कालवे, त्यावरील चाऱ्या, पोटचाऱ्यांमुळे पाण्याची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. बाष्पीभवनाबरोबरच कालव्यांचे भराव, अस्तरीकरण ढासळल्यामुळे पाणी झिरपते. त्याचबरोबर कितीही उपाययोजना केल्या, कारवाई केली तरीदेखील सायफनने पाणी चोरीचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे आवर्तन सोडल्यापासून ते बंद करेपर्यंत किमान ५० टक्के पाण्याची गळती होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून बंद नलिकेतून कालव्याचे पाणी सोडणे यावर पर्याय होऊ शकतो. परंतु, त्यामुळे कालव्यालगतच्या विहिरींना फटका बसेल. कालव्यातून झिरपलेले पाणी विहिरींमध्ये साठते. या पाण्यावरदेखील कर आकारणी केली जाते. त्यामुळे महसूलदेखील बुडेल, अशी स्थिती असताना कालव्याने वाहणाऱ्या पाण्याची गळती रोखणार कशी, याबाबत सध्या तरी कोणतीही उपाययोजना नाही, असे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाण्याची गळती रोखणे अशक्य आहे. त्याचबरोबर बंद नलिकेतून पाणी आणल्यास शेतकऱ्यांना त्याचा त्रास होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींना कालव्याच्या आवर्तनाच्या काळात पाझराचे पाणी मिळते. त्यावर शेती होते. नैसर्गिकरीत्या होत असलेली गळती रोखणे शक्य नाही. सायफनवर कारवाई सातत्याने होते. त्यामुळे ते प्रमाण कमी आहे.- ए. आर. भोसले, उपअभियंता, बारामती उपविभाग
५० टक्के कालव्याच्या पाण्याची गळती
By admin | Published: March 17, 2016 3:03 AM