पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी परिसरातील गावांची लाेकसंख्या झपाट्याने वाढली आणि त्यांचे सांडपाणी थेट धरणात मिसळले जाऊ लागले. यावर वेळीच उपाययाेजना केली गेली नाही. परिणामी, महापालिका पुरवठा करत असलेल्या पाण्यात ५० टक्के सांडपाणी आहे, असे सांगत माजी महापाैर प्रशांत जगताप यांनी पुण्याच्या पाणीपुरवठ्याकडे लक्ष वेधले.
निमित्त हाेते, पुणे महापालिका वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात बुधवारी (दि. १६) ‘लोकमत’च्या वतीने आयाेजित लाेकदरबार कार्यक्रमाचे. यात पुणे शहरात आतापर्यंत झालेली महत्त्वाची कामे, शहराला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर सांगोपांग चर्चा झाली. याप्रसंगी पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे यांच्यासह माजी महापाैर दीप्ती चौधरी, दत्ता धनकवडे, प्रशांत जगताप, मुरलीधर मोहोळ, माजी आयुक्त महेश झगडे, अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, माजी नगरसचिव सुनील पारखी यांनी परखड भाष्य केले.
पुणे महापालिका खडकवासला धरणातील पाण्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा करते. पूर्वी पावसाळ्यात गढूळ पाणी येत होते. आता खडकवासला धरणाच्या वरच्या बाजूच्या गावांची लोकसंख्या वाढली. मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्यांचे सांडपाणी नाल्यावाटे थेट धरणात जमा होत आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्यात ५० टक्के सांडपाणी मिसळले जात आहे.
धरणातील पाणी प्रक्रिया करून महापालिका पुणेकरांना देत असले तरी अधिक शुद्ध पाणी मिळावे यासाठी सांडपाणी धरणात मिसळू नये यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यासाठी महापालिका, पीएमआरडीए, जिल्हा परिषद आणि राज्य सरकार यांनी संयुक्तपणे प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे, असे मत जगताप यांनी व्यक्त केले. त्यांना अन्य लाेक प्रतिनिधींनी देखील दुजाेरा दिला.
यात पुण्याची झपाट्याने होणारी वाढ, शहरावर पडणारा अतिरिक्त ताण, वाहतुकीची कोंडी, पाण्याचा प्रश्न यासह विविध विषयावर चर्चा झाली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे ही राज्यातील सर्वांत मोठी महापालिका झाली आहे. नागरिक आणि प्रशासनाच्या सोयीसाठी पुण्याच्या दोन महापालिका करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत सर्वांनीच व्यक्त केली.
मुरलीधर मोहोळ म्हणाले...
- मी महापौर असताना पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले. महापालिका भवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. हे दोन्ही नेते मी महापौर असताना महापालिकेत आले. याचा मला अभिमान आहे.
- मुंबई महापालिकेनंतर कोणत्याही महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय नव्हते. संभाव्य साथीचे आजार पाहता यासाठी प्रयत्न हाेणे गरजेचे हाेते. पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आणि ते सुरूही झाले.
- समान पाणी पुरवठा योजना, कर्वे रस्त्यावरील उड्डाणपूल, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची मंजुरी ही माझ्या काळातील कामे आहेत. नदी सुधार प्रकल्पाची सुरुवात केली. घनकचऱ्यावर महापालिकेने चांगले काम केले आहे.
- कोरोनाच्या काळात काम करण्याचे सर्वांत मोठे आव्हान माझ्या पुढे होते. महामारीतही महापौर म्हणून फिल्डवर उतरून काम केले. महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी चांगले काम केले. पीएमपीच्या बसची संख्या वाढविली पाहिजे.
- मेट्रोचा विस्तार वाढविणे गरजेचे आहे. आगामी काळात वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.
माजी नगरसचिव सुनील पारखी म्हणाले...
- नगरसचिव म्हणून महापालिकेत ११ वर्षे ८ महिने काम केले. महापालिकच्या इतिहासात नगरसचिव पदावर जास्त काळ राहणाऱ्यांमध्ये मी दुसरा आहे. या काळात सर्वांचे सहकार्य लाभले. या काळात १९५० पासूनच्या सर्व रेकॉर्डचे डिजिटायझेशन करायचे होते; पण ते करता आले नाही. तसेच १९५२ पासूनच्या सर्व नगरसेवकांनी केलेली कामे, त्यांच्या प्रभागाचे नाव नमूद करायचे होते. पण तेही करायचे राहून गेले. पुणे महापालिकेच्या कामकाजाबाबत नियमावली तयार केली होती. ती पण मंजुरीसाठी राहून गेली.
माजी अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले...
वॉर्ड ऑफिसर म्हणून काम करताना अनधिकृत बांधकामावर धडाकेबाज कारवाई केली. महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त म्हणून काम करताना शून्य कचरा हा उपक्रम राबविला. त्यासाठी नियोजन केले. कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले. बचतगटाची चळवळ उभी केली. वस्ती पातळीवर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. महापालिकेत वॉर्ड ऑफिसर ते अतिरक्त आयुक्त यापर्यंतच्या सर्व पदावर काम केले आहे.
शहरात वाहतुकीचा प्रश्न फार बिकट झाला आहे. मी महापौर झाल्यावर सर्वांत आधी यावरच लक्ष केंद्रित करून काम केले. उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्ताव माझ्याच काळात झाले. धनकवडी, संचेती, ससून, सातारा रस्ता असे उड्डाणपूल बांधल्यामुळे वाहतूक थोडी काही प्रमाणात तरी तेथे कमी झाली आहे. राज्य सरकारमधील प्रशासनाची मंजुरी मिळवणे ही अवघड गोष्ट असते. मात्र पालकमंत्री अजित पवार यांच्यामुळे अनेक गोष्टी सुसह्य झाल्या. पुणे हे ऐतिहासिक शहर आहे, मात्र ज्या प्रमाणात त्याची प्रसिद्धी व्हायला हवी ती होत नव्हती. मी यात लक्ष घालून अनेक गोष्टी करून घेतल्या. मुख्य म्हणजे जुनी झालेली पुणे दर्शन बस अत्याधुनिक करून घेतली. त्याशिवाय शहरात एक हेरिटेज वॉक सुरू केला. शहरातील सर्व ऐतिहासिक स्थळांची छायाचित्रांसह माहिती असलेले एक कॉफी टेबल बूक प्रकाशित केले. त्यात संपूर्ण पुणे शहराची व्यवस्थित माहिती देता आली. या पुस्तकाचे आजही कौतुक केले जाते. सर्व मोठ्या शहरांमध्ये एक कन्व्हेंशन सेंटर असते. मोठी अद्ययावत इमारत असलेल्या या सेंटरमध्ये शहराशी संबंधित विषयांच्या तज्ज्ञांमध्ये चर्चा होतात. समान हितसंबंधी गट अशा इमारतींमध्ये बसून एकत्रितपणे समस्यांवर विचार करतात. शंका उपस्थित करतात. त्यावर उपाय शोधतात, त्या उपायांवर संशोधन करतात. महापौर असताना मी काही देशांमध्ये दौरे केले, तिथे अशा इमारती मला दिसल्या. शहरात आलेले पाहुणे, वेगवेगळ्या विषयांवरील तज्ज्ञ अशांची संमेलने या इमारतीत आयोजित केली जातात. पुण्यात असे एक कन्व्हेंशन सेंटर असावे, अशी माझी इच्छा होती. त्यादृष्टीने मी फार प्रयत्न करत होतो, मात्र ते शक्य झाले नाही याची मला खंत आहे.
- दत्ता धनकवडे, माजी महापौर
छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची जागा निश्चित करण्यापासून ते स्मारक पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न मी केला याचा मला आनंद आहे. सॅनहोजे या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवता आला, याचा मला कायम अभिमान वाटतो. मी महापौर असताना परदेशांतील अनेक शहरांसोबत पुणे शहराला जाेडले. सिस्टर सिटी या संकल्पनेअंतर्गत पुणे आणि ती शहरे यांच्यात अनेक गोष्टींची देवाणघेवाण केली. हे करत असताना अनेक प्रकल्पांमुळे विदेशातील प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळाली. यासोबतच बचतगटाची चळवळ सुरू करणे करून ती चळवळ वाढविण्याचा प्रयत्न मी केला. महिलांना अशा पद्धतीने एकत्र करता आले, आत्मविश्वास देता आला याचा मला आनंद आहे. असे अनेक बचतगट माझ्या काळात तयार झाले. त्यांना आम्ही महापालिकेच्या माध्यमातून कितीतरी मदत केली. महिलांना यामुळे घरामध्ये निर्णयाचा अधिकार मिळाला. खंत वाटावी अशाही काही गोष्टी झाल्या. मॉरिशस प्रशासन आणि पुण्यातील बचतगट यांच्यामध्ये करार करून अनेक प्रकल्प राबविले. तिथल्या नागरिकांच्या मदतीने तिथे महाराष्ट्र सदन बांधण्याची माझी कल्पना होती. त्याला महापालिका आणि राज्य सरकार स्तरावर मंजुरीही मिळाली. त्यासाठी मी बराच पाठपुरावा केला. मात्र पुढे माझी मुदत संपली, सरकारही बदलले, महापालिकेतदेखील दुसऱ्या पक्षांची सत्ता आली. यात तो विचार आणि ती कल्पनाही मागे पडली. पुढे त्यावर काहीच झाले नाही. बचत गट चळवळीचेही असेच झाले. त्यांना मिळणारी मदत कमी झाली. त्यानंतर या बचतगटांचा वापर निवडणुकीत होऊ लागला. आता तर महिला बचतगटांचे तेच काम राहिले आहे याची मला खंत आहे.
- दीप्ती चौधरी, माजी महापौर
मी पुण्याची पहिला महिला महापौर. त्यामुळे मला सुरुवातीपासूनच पुणेकरांचं प्रेम आणि आदर मिळाला. मला अनेक कामे करता आली. त्यावेळी महापालिकेचे बजेट फार मोठे नसे. त्यातच माझ्या कारकिर्दीतील ५ महिने निवडणूक आचारसंहितेतच गेले. माझ्या कार्यकाळात ५ निवडणुका झाल्या, मात्र जे काही ६ महिने मला मिळाले, त्या काळात मी महिलांसाठी म्हणून अनेक कामे केली. आम्ही वस्तीतील महिलांना त्यांची स्वाक्षरी करणे शिकवले. त्याशिवाय बचतगटांना मीही बरीच मदत केली. विरोधक आणि सत्ताधारी असे दोघेही आमच्या वेळी एकत्रच असत. निवडणुकीपुरते मतभेद व नंतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकत्र अशी स्थिती होती. आज तसे नाही हे दिसते त्यावेळी फार वाईट वाटते. पुणे शहराचे स्वरूप प्रत्येक वर्षी बदलताना दिसत आहे. पुण्याच्या चारही बाजूने वस्ती झपाट्याने वाढत आहे. नागरीकरण झपाट्याने वाढल्यामुळे महापालिका त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल का? हा महत्त्वाचा प्रश्न समोर उभा राहतो आहे. शहराची लोकसंख्या आणि महापालिकेवरचा ताण लक्षात घेता पुणे शहराला २ महापालिकांची आवश्यकता आहे, असे लक्षात येते. अनेक महापालिकेत ५ वर्षे झाले तरी निवडणुका झाल्या नाहीत. नगरसेवक नसल्यामुळे स्थानिकांचे पाणी, रस्ते, नागरी सुविधा अशी अनेक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचत नाहीत. सध्याच्या परिस्थितीत पुणेकरांसमोर सर्वांत महत्त्वाचा प्रश्न वाहतूककोंडीचा आहे. हा प्रश्न एका चौकापर्यंत किंवा एका रस्त्यापर्यंत मर्यादित नाही. शहराच्या प्रत्येक रस्त्यावर सध्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर रूप घेत आहे. यावर विचार करून ही समस्या निवारणाकडे सर्व पक्षांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
- कमल व्यवहारे, माजी महापौर