लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रब्बी हंगामाच्या जवळपास ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्वारी व गव्हाची तर उगवण झाली असून गव्हाला आता थंडीची प्रतिक्षा आहे. यावेळी पाऊस चांगला झाल्याने विहिरी, तलाव व अन्य साठ्यांमध्ये पाणी मुबलक आहे. हवामान चांगले राहिल्यास रब्बी हंगामातील पिके शेतकऱ्यांना हात देतील. पिकांवर किड पडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
रब्बी हंगांच्या राज्यातील एकूण ५१ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रापैकी २२ लाख ३३ हजार २४७ हेक्टरवर आता ज्वारी, गहू, मका तसेच हरभऱ्यासारखी कडधान्ये, करडई, जवस, तीळ, सूर्यफूल या तेलबियांची पेरणी सुरू आहे. चांगल्या हवामानामुळे पिकाची उगवण समाधानकारक आहे. खरीप हंगामातील अतिवृष्टीनंतर आता शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर केंद्रीत झाल्या आहेत.
रब्बीतील ज्वारीचे राज्यातील क्षेत्र २० लाख २७ हजार २५८ हेक्टर आहे. त्यापैकी ११ लाख ११ हजार ९६० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. रब्बीतले दुसरे महत्त्वाचे पीक असलेल्या गव्हाचे सरासरी क्षेत्र ८ लाख ७५ हजार ६३३ हेक्टर आहे. त्यापैकी १ लाख ४७ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
तेलबियांचे एकूण क्षेत्र ८९ हजार २२७ हेक्टर आहे. त्यापैकी १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात करडईचे प्रमाण जास्त असून ६ हजार ६८७ हेक्टरवर करडई आहे. ९८३ हेक्टरवर सूर्यफूलाची पेरणी करण्यात आली आहे. जवस व तीळ अनुक्रमे १ हजार ७८६ व ९७६ हेक्टरवर पेरले गेले आहेत. हरभऱ्याचे राज्यातील सरासरी क्षेत्र १७ लाख ४३ हजार २५९ आहे. त्यापैकी ८ लाख ३८ हजार हेक्टर पेरणी झाली आहे. यंदा राज्यात पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने रब्बीत दमदार उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.