मंचर : बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख ५ हजार, मंगळसूत्र, एलईडी टीव्ही असा ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथील खालचा मळा येथे रात्री घडली. घरातील वृद्धा एकटीच असल्याने चोरट्यांच्या भीतीने रात्री १० वाजता शेजारील घरात झोपण्यास गेल्याने बालंबाल बचावली. चोरीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चांडोली खुर्द गावच्या खालचा मळा परिसरात शेवंताबाई शिवराम इंदोरे यांचे घर आहे. सध्या चोरीचे प्रकार वाढल्याने इंदोरे रात्री घराला बाहेरून कुलूप लावून शेजारील घरात झोपण्यासाठी गेल्या. सकाळी उठून परत आल्या असता चोरीचा प्रकार निदर्शनास आला. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून आतील साहित्य अस्ताव्यस्त टाकले. शेवंताबाई इंदोरे यांना डॉक्टर खर्चासाठी त्यांच्या भावाने ५ हजार रुपये दिले होते. ते त्यांनी कपाटात ठेवले होते. चोरट्यांनी हे ५ हजार व दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. भिंंतीवरील १५ हजार किंमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेला. घरामध्ये अज्ञात चोरट्याची बनियन आढळून आली. घराबाहेर असलेल्या ओट्यावर चोरट्यांनी त्यांचा चाकू ठेवला आहे. बाजूला कुलूप तोडण्यासाठी वापरलेले छोटे दगड ठेवलेले आढळले. इंदोरे यांच्या शेजारील घराच्या दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी तोडले. मात्र त्या घरात काहीच नव्हते. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के, नवनाथ नाईकडे, अनिल वाघमारे, पोलीसपाटील लहू इंदोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मंगळवारी रात्री पोखरकरमळा येथील गुलाब आबाजी बांगर यांच्या बंगल्यात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता.