लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा ठराव नुकताच मान्य करण्यात आला असून, त्यामुळे सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पातील तरतुदीतून प्रत्येक कर्मचाऱ्याला ५० हजार रुपये देण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. पालिकेच्या २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात वेतन आयोगापोटी द्यावयाच्या फरकाच्या रकमेकरिता ६० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. १० मार्च २०२१ च्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मान्य करून अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर टप्प्याटप्प्याने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम दिली जाणार आहे.
परंतु, तत्पूर्वी वेतन आयोग लागू करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव मान्य झाल्याने पुणे महापालिका (मान्यताप्राप्त) कामगार युनियन व इतर संघटनेचे अनेक पदाधिकारी वेतन आयोगापोटी देण्यात येणारा फरक मिळावा अशी विनंती करत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पातील अर्थशीर्षकावर उपलब्ध असलेल्या रकमेतून पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये फरकाची रक्कम, ३१ मार्चपूर्वी देण्यात यावी अशीही मागणी बिडकर यांनी केली आहे.