पुणे : विनापरवाना फ्रेशर्स पार्टी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा करमणूक कर विभागाने घेतला आहे. विनापरवाना फ्रेशर्स पार्ट्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात सरासरी पंधरा ते वीस फ्रेशर्स पार्ट्यांचे आयोजन केले जाते. परंतु, या वर्षी आतापर्यंत फ्रेशर्स पार्टीसाठी केवळ दोनच अर्ज आल्याचे जिल्हा करमणूक कर अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी सांगितले.गेल्या काही वर्षांपासून फ्रेशर्स व फ्रेंडशिप डेच्या पार्टीचे आयोजन करण्याची के्रझ वाढत आहे. फ्रेशर्स पार्टीमध्ये महाविद्यालयातील सीनिअर विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांसाठी पार्टीचे आयोजन करतात. पार्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी नृत्य व विविध खेळांचे आयोजन करतात. पण आता या पार्ट्यांचे स्वरूप बदलू लागले आहे. महाविद्यालयाच्या आवारात होणाऱ्या पार्ट्या पंचतारांकित हॉटेल व पबमध्ये होऊ लागल्या आहेत. या पार्ट्यांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक ते तीन हजार रुपये शुल्क घेतले जाते. पार्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी मद्य, जेवण व नामांकित डी. जे.ची सोय केली जाते. एका दिवसाच्या पार्टीत लाखो रुपयांचा फायदा होत असल्याने पार्टी आयोजिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी चिल्लर पार्टीमध्ये या फ्रेशर्स पार्ट्यांमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य देण्यात आले होते. यामुळे फ्रेशर्स पार्टीचे खरे रूप उघडकीस आले होते. (प्रतिनिधी)
विनापरवाना फ्रेशर्स पार्टी केल्यास ५० हजारांचा दंड
By admin | Published: August 04, 2015 3:25 AM