पुणे : मला पुण्याचं ५०, १०० वर्षांचं भविष्य घडवायचंय, सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेत समस्यांचं निराकरण करायचंय तर वाहतूक, कचरा, पाणी अशा महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचे आहे. अशा प्रतिक्रिया देत पुण्यातील लोकसभेचे उमेदवार एकाच टेबलवर गप्पा मारतांना आणि पुण्याच्या प्रश्नावर चर्चा करतांना दिसले. निमित्त होते वाडेश्वर कट्टा या कार्यक्रमाचे.
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, पुणे लोकसभेसाठी रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचारही जोरात सुरू आहे. निवडणुकांच्या दरम्यान आपणच कसे योग्य उमेदवार हे सांगताना दोन्ही बाजूचे उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत असतात. मात्र पुण्यात आज हे उमेदवार चक्क एकमेकांशी विकासाच्या गप्पा मारताना दिसले. पुणे लोकसभेच्या रिंगणात असलेले महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आणि सोबतच अपक्ष निवडणूक लढवू इच्छिणारे वसंत मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते या वाडेश्वर कट्टा कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, आमच्या अगोदर काम सगळ्यांनी केली. आता पुढं काय करायचं हे बघावं लागेल. मला पुण्याचं ५०, १०० वर्षांचं भविष्य घडवायचं आहे. कारण पुढच्या पिढीने आम्हाला नाव नको ठेवायला कि तुम्ही त्या काळात कमी पडला आहात. केंद्र सरकारच्या दृष्टीने इथल्या प्रश्नांवर विचार केला पाहिजे. म्हणजेच पुढील ५० वर्षांचा विचार आत करायला हवा. शहरातल्या राजकीय सामाजिक राजकीय जीवनात मी काम करतो. महापालिका महापौर, स्थायी समिती अध्यक्ष पाहता मला शहराचा आवाका माहित आहे. मी पुण्याच्या कानाकोपऱ्यात पोचलोय. पुण्याला सर्वोच्च स्थानावर घेऊन जायचंय. भाजपाबरोबर राहून मला चांगलं काम करता येऊ शकत असा विश्वास आहे.
धंगेकर म्हणाले, राजकीय सामाजिक जीवनात काम करताना मी चौकट आखून घेतली नाही. सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत मी पोचलो. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पक्षाला वाटलं कि मी सामान्यांच्या अडचणी सोडवू शकतो. त्यामुळे पक्षाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला बहुमान दिला. त्यांच्या लक्षात आलं कि पुणेकर यांना चांगलं मतदान करू शकतात. म्हणून मला उमेदवारी दिली. लोकशाहीत देशाचा विकास झाला. पण केजरीवाल यांना जेलमध्ये पाठवलं, काहींना पाठवता पाठवता पक्षात घेतल. अजित पवारांबाबत तेच झालं. अशोक चव्हाण यांनाही पक्षात ओढलं. भयमुक्त राजकारण देशात सुरु आहे. लोकशाही टिकली तर भीतीच्या वातावरणातून मुक्त होतील. तर सामान्यांचे प्रश्नही लवकर सुटतील.
मला हि निवडणूक पुणेकरांच्या प्रश्नांवर लढायची
मी काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला. पक्ष सोडला, पुणे शहरात मनसेची एक ताकद आहे. आधीपासून मनसेला चांगलं मतदान आहे. एक चुकीचा अहवाल पक्ष श्रेष्ठींकडे गेला त्यामुळे मी बाहेर पडलो. एका शहराला दिशा देण्याचं काम मी करू शकतो. मी आधीपासून विरोधी पक्षातच आहे. मला हि निवडणूक पुणेकरांच्या प्रश्नांवर लढायची आहे. शहरात वाहतूक, पाणी, कचरा हे प्रश्न महत्वाचे असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले आहे.