पुणे :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल्सचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. जेथे एसटीला ५०० रुपये तिकीट तेथेच ट्रॅव्हल्सला २,५०० रुपयांचे तिकीट आहे. यामुळे चौपट तिकीट काढून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
एसटीचे दर कोणत्याही उत्सवाला ‘जैसे थे’च असतात तर ट्रॅव्हल्स चालक त्यांचे दर वाढवून प्रवाशांना लुटण्याचाच प्रकार यानिमित्ताने करतात. पुण्यात राज्यभरातून शिकायला आणि नोकरीला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सव, दिवाळी या सणांसाठी हे लोक आपल्या मूळ गावी जातात. पण दरवर्षी त्यांना खासगी ट्रॅव्हल्सने जावे लागले. यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे भरून प्रवास करावा लागत असल्याने याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
बस-ट्रॅव्हल्सला या मार्गांवर गर्दी
पुण्यातून कोकणासह मराठवाडा, विदर्भात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एसटीकडून कोकण आणि इतर विभागांसाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत. तरीही अनेकजण ट्रॅव्हल्सचे तिकीट बुक करून ठेवतात. परंतु, प्रवासाची तारीख उत्सवाच्या दरम्यानची टाकली की, आपोआप तिकीट दर अधिक असल्याचे दिसून येते.
जवळपास दीडपट तिकीट जास्त
मार्ग - एसटी दर - ट्रॅव्हल्स दर
औरंगाबाद - ५१५ - १४४०
मुंबई - ५१५ - ११७२
नागपूर - १६१५ - २१००
कोल्हापूर - ५०० - २५००
जळगाव - ६३० - ११४३
रत्नागिरी - ४७८ - १४४०
एसटीचा प्रवास सुरक्षित
शक्यतो प्रवास करताना प्रवाशांनी एसटीनेच प्रवास करणे फायद्याचे असते. एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. एसटीने प्रवास करताना अपघात झाला तरी त्याची जबाबदारी राज्य शासन घेत असते, तसेच प्रशिक्षित चालक एसटीला असल्याने प्रवास सुखकर होतो.
पैसे जास्त देण्याशिवाय पर्याय काय?
मला ३० ऑगस्टच्या रात्री रत्नागिरीला जायचे आहे. ३१ला गणरायाचे आगमन होत आहे. त्यामुळे एसटीत जागा मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने खासगी बसचा पर्याय जास्त पैसे देऊन स्वीकारला आहे.
- पिनाक बाम
- मी शिक्षणासाठी पुण्यात असतो. मला गणपतीला औरंगाबादला जायचे आहे. पण उत्सवादरम्यान प्रवाशांची प्रचंड गर्दी बसस्थानकावर असते, त्यामुळे बसमध्ये बसायला जागा मिळतेच असे नाही. त्यात घरी लवकर जाण्याची ओढ त्यामुळे तिप्पट पैसे देऊन खासगी बसचा पर्याय निवडावा लागतो.
- अजय गिरी