पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारला ३० मेला सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाजपच्या वतीने पुणे शहरातील ४२ प्रभागांमध्ये 'सेवाकार्य दिन' साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये शहर भाजपचे ५ हजार कार्यकर्ते या सेवकार्यात सहभागी होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात घेता कोणताही उत्सव होणार नाही, असेही ते म्हणाले.
मुळीक म्हणाले, 'शहरातील महापालिकेचे ४२ प्रभाग आणि पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रांत २०० हून अधिक सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये कोरोनाविषयी जनजागृती, आरोग्य शिबिरे आणि गरजूंना मदत केली जाणार आहे. शहरातील भाजपाचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह शहर भाजपचे ५ हजार कार्यकर्ते या सेवकार्यात सहभागी होणार आहेत. पक्षातर्फे कोरोनाच्या संकटात सातत्याने सेवाकार्य चालू आहे. कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून आणि प्रशासनाला सहकार्य करून हा उपक्रम होईल.
भाजपच्या युवा मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चा अशा सर्व मोर्चांचे कार्यकर्ते ३० तारखेला रक्तदान शिबीरांचे आयोजन करणार आहेत. आरोग्य शिबिरे, कोरोना लसीकरण, म्युकरमायकासिस जनजागृती, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, ऑक्सिमीटर आणि तत्सम सेवा दिल्या जाणार आहेत. असेही त्यांनी सांगितले आहे.
मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल नुकतीच पक्षाची राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक झाली. त्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार यंदा मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष सेवाकार्य करण्यात येईल. असेही ते म्हणाले.