पुणे : राज्याच्या विविध भागांतील तब्बल ५१ गडकिल्ले पुण्यातील पिता-पुत्रांनी केवळ २४ दिवसांमध्ये पादाक्रांत केले. त्यासाठी २,६०० किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरून, तर ४५० ते ५०० किलोमीटरचा प्रवास एसटी बसने करून रायगडावर या मोहिमेचा शेवट त्यांनी केला.दीपक माधव झोरे (वय ५७) आणि निरंजन दीपक झोरे (वय २०, शनिवार पेठ) अशी या पिता-पुत्रांची नावे असून, सर्व गडांच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला वेळ नोंदविण्यास त्यांनी विशिष्ट कॅमेऱ्याचा उपयोग केला आहे. सर्व मोहिमेची छायाचित्रे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.२१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान केलेल्या या पदभ्रमण मोहिमेत त्यांनी नगर जिल्ह्यातील साल्हेर हा ५,३३५ फूट, कळसूबाई शिखरापेक्षाही अधिक उंच असलेला गड तसेच जवळील सालोटा, मुल्हेरगड, मोरागड हे गडही केवळ ४ तासांमध्ये पादाक्रांत केले. राजगड ते तोरणा हा टे्रक फक्त २ तासांत पूर्ण केला. अनुभवी गिर्यारोहकांना याविषयी शंका येणे साहजिक आहे; मात्र दीपक झोरे यांनी या सर्व प्रवासाचा पुरावा म्हणून छायाचित्रण केले असून, छायाचित्रांवर तारखेसह गड चढण्यासाठी लागलेल्या वेळाची नोंद उपलब्ध आहे. एकूण २७ दिवसांच्या मोहिमेत ४ दिवस पुण्यात विश्रांती घेऊन, जीवनावश्यक वस्तू जमा करून त्यांनी पुन्हा पदभ्रमणाला सुरुवात केली होती. दीपक झोरे मिळेल ते काम करून कुटुंब चालवितात. त्यांच्या या पदभ्रमणाची सुरुवात त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेऊन केली. २४ दिवसांत ५१ किल्ले सर करण्याच्या या मोहिमेची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉडर््समध्ये व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.
५१ गडकिल्ले २४ दिवसांमध्ये पादाक्रांत
By admin | Published: December 22, 2016 2:29 AM