पिंपरी : मावळ, मुळशी परिसरात संततधार सुरू आहे. गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण ५१ टक्के भरले आहे. पुढील सहा महिने पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. धरण भरत असले तरी दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलण्यात येणार नसल्याचे प्रशासनाचे मत आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. काही दिवसांसाठीची पाणीकपात महापालिका प्रशासनाने अनिश्चित काळासाठी कायम ठेवली. साडेतीन वर्षे झाली दिवसाआडच पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे.
पाच दिवसांत वाढले पाणी
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता. मागील महिन्यातील २५ तारखेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यानंतर काही काळ पावसाने ओढही दिली. मात्र, पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी, धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
असा वाढला पाणीसाठा
पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रातील पावसामुळे नदीनाले वाहू लागले आहेत. १ जूनपासून धरण परिसरात एक हजार १० मिमी पावसाची नोंद झाली. तर, पाणीसाठ्यात ३३.४४ टक्क्यांनी वाढ झाली. धरणातील पाणीसाठा ५१.४३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पुढील सहा महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मात्र, पाणीकपात मागे घेतलेली नाही.
पिंपरी-चिंचवडला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा होता. ५८० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. पवना धरणात सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. मात्र, दिवसाआड पाणीपुरवठा तूर्तास मागे घेणार नाही.
श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग