पुणे : महापालिकेच्या ‘व्हॅक्सिन ऑन व्हिल्स’ या उपक्रमांतर्गत शहरात आतापर्यंत, ३३० सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून ५१ हजार ९५१ जणांचे लसीकरण केल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.
शहरात सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयातील कर्मचारी, दिव्यांग, वृद्ध (आश्रमातील), पथारीवाले, फळ-भाजी विक्रेते, देवदासी, घरेलू कामगार महिला, बांधकाम मजूर यांचे व्हॅक्सिन ऑन व्हिल्स उपक्रमांतर्गत लसीकरण केले आहे. संबंधितांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात आले. साधारणत: १ लाख ४४ हजार ५०० जणांचे ‘व्हॅक्सिन ऑन व्हिल्स’च्या माध्यमातून लसीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
सध्या ३३० सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून हे लसीकरण होत आहे़ यामध्ये २३ जुलैपर्यंत ३ हजार ७२२ दिव्यांग, २ हजार ३८१ वृद्ध (आश्रमातील), कोरोना संसर्गाचे सुपरस्प्रेडर असणाऱ्या पथारीवाले, फळ-भाजी विक्रेते, दुकानदार अशा ११ हजार ५४३ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे़
याचबरोबर १ हजार ३३५ देवदासी, ५ हजार ७० घरेलू कामगार महिला, २ हजार १३५ बांधकाम मजूर, २९० तृतीयपंथी, झोपडपट्टीतील २ हजार ९२१ रहिवाशांचे तर शासकीय कार्यालयातील २२ हजार ५५४ जणांचे लसीकरण हे त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन करण्यात आले आहे.
-----------------