पुणे : गेल्या अाठवडाभरापासून पुण्यात हाेत असलेल्या परतीच्या पावसामुळे शहरातील विविध भागातील 52 झाडे जमीनदाेस्त झाली अाहेत. काल संध्याकाळी झालेल्या पावसात 29 झाडपडीच्या घटना घडल्या अाहेत. यातील सर्वात जास्त घटना या पुण्यातला उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या काेरगाव पार्क भागातील अाहेत.
सकाळी कडक ऊन अाणि दुपारनंतर मुसळधार पाऊस असे वातावरण गेले काही दिवस पुणेकर अनुभवत अाहेत. साेसाट्याच्या वाऱ्यासाेबत येणाऱ्या पाऊसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप येत अाहे. दुपारनंतर अचानक अाभाळ भरुन येते, विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरुवात हाेते. यात जाेरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना वाढत अाहेत. रस्त्यावरची माेठमाेठाली झाडे या पावसाच्या तडाख्यात सापडत असून अनेक झाडे मुळापासून उखडून पडली अाहेत. मंगळवारी झालेल्या पावसात काेरगाव पार्क येथील बंगल्यांमधील अनेक झाडे जमीनदाेस्त झाली. रांगेत असलेल्या बंगल्यांमधील ही झाडे पडल्याने रस्त्यावर काहीकाळ वाहतूक काेंडी झाली हाेती. त्याचबराेबर अनेक वाहनांचेही नुकसान झाले. झाड पडीमुळे काही भागातला विजपुरवठा खंडीत झाला हाेता. अग्निशमन दलाच्या वतीने युद्धपातळीवर ही झाडे दूर करण्याचे काम हाती घेण्यात अाले हाेते. अाजही या झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडलेल्या अाढळून अाल्या.
दरम्यान रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करताना अचानक पडलेल्या फांदीमुळे अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी झाले अाहेत. यातील चार जणांना उपचारानंतर घरी साेडण्यात अाले अाहे तर एक जवान गंभीर जखमी अाहे.