बारामती : बारामती शहरात बुधवारी (दि. १४) ५२ वर्षीय महिलेची जटेतून मुक्तता करण्यात आली. गेल्या २० वर्षांपासून अंधश्रद्धेतून या महिलेने जटा राखल्या होत्या. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीने यासाठी पुढाकार घेतला.
संगीता मोरे असे या महिलेचे नाव आहे. त्या शहरातील आमराई भागात वास्तव्यास आहेत. अजूनही अंधश्रद्धेतून अथवा देव-देवतांच्या नावे जटा राखल्या जातात. या जटांच्या भारामुळे संबंधित व्यक्तिला शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अनिंसने या अनिष्ठ प्रथेविरोधात गेल्या काही वर्षांपासून काम सुरु केले आहे. बारामतीतील मोरे यांनी २० वर्षांपासून राखलेल्या जटातुन त्रास होत असल्याने त्या काढाव्यात अशी विनंती त्यांनी अनिंसकडे केली होती. त्यानुसार जटा उतरविण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव यांनी सांगितले, अनिंसने राज्यभर फिरून आजवर १९६ महिलांची जटेतून मुक्तता केली आहे. ६ महिने ते ५० वर्षांपर्यंत वाढलेल्या जटा संबंधिताचे समुपदेशन करून, त्यांच्या मनातील अंधश्रद्धा, भीती दूर करून काढल्या आहेत. बारामतीत बुधवारी जटा काढलेल्या संगीता मोरे या १९७ व्या महिला आहेत.यापुर्वी १९६ महिलांच्या जटा काढल्या आहेत.यावेळी मिलिंद देशमुख यांच्यासह समितीचे पदाधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.----------------------