पुणे : समान पाणीपुरवठा योजना आणि सेवा वाहिन्यांसाठी यावर्षी सुध्दा शहरातील तब्बल ५२५ किलोमीटर लांबीचे रस्ते खोदले जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांची खड्ड्यांमधून सुटका काही लवकर होणार नाही.
शहरात समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. योजनेसाठी शहरात तब्बल १ हजार ८०० किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. कोरोना आणि यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या आणि मलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली. यानंतर योग्य पद्धतीने खोदाईची दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले. त्यामुळे महापालिका प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करुन खड्डे बुजवावे लागले. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.
समान पाणीपुरवठा योजनेचे बरेच काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये खोदाई करावी लागणार आहे. समान पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिन्या आणि बल्क मीटर बसवण्यात येणार आहेत. शहरात चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी टाक्यांचे बांधकाम सुध्दा सुरु आहे. २४ टाक्या वेगवेगळ्या भागात बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे याला मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे काम सुध्दा करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाने याअगोदर ६०० किलोमीटर रस्ते खोदाईला परवानगी दिली आहे. २०२३-२४ या वर्षासाठी ४०० किलोमीटर रस्ते खोदाईला परवानगी देण्यात आली आहे. तसेच काही मोबाइल कंपन्यांना सुध्दा परवानगी यावर्षी देण्यात येणार आहे. यापैकी जीओ कंपनीला १२५ किलोमीटर रस्ते खोदाईची मान्यता देण्यात आहे.