पुणे : पुण्यात संध्याकाळ पर्यंत अंदाजे 53 ते 55 टक्के मतदान झाले असून बारामती येथे 60 टक्क्याहून अधिक मतदान झाल्या असल्याचा अंदाज जिल्हाधिकारी नवलकिशाेर राम यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पुण्यात शांततेत मतदान पार पडल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ईव्हिएम संदर्भातल्या किरकाेळ तक्रारी वगळता गंभीर कुठलिही तक्रार प्राप्त न झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे, बारामती, सातारा, सांगली, म्हाडा, काेल्हापूर, अहमदनगर, जळगाव आदी ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. पुण्यात सकाळी मतदानाचा उत्साह दिसून आला परंतु दुपारनंतर मतदारांची संख्या घटली. पुण्यात गेल्या लाेकसभेच्या निवडणुकीला 54 टक्के मतदान झाले हाेते. यंदा साधारण याच टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाल्याचा अंदाज आहे. तर बारामती मतदार संघामध्ये 60 टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे. त्यामुळे याचा फायदा किंवा ताेेटा काेणाला हाेईल हे 23 मे नंतरच स्पष्ट हाेऊ शकणार आहे. 30 ते 35 लाेकांनी मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत याेग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
नवलकिशाेर राम म्हणाले, काही शुल्लक तक्रारी वगळत शांततेत मतदान पार पडले. ज्या मतदारांनी मतदार यादीत नाव नाही अशी तक्रारी केल्या त्यावर येत्या काळात याेग्य ती कारवाई करण्यात येईल. काही नागरिकांचे दाेन ठिकाणी नाव असल्याचे आढळले. याबाबतही माेहीम घेऊन यावर ताेडगा काढण्यात येणार आहे. अनेक जनजागृतीपर कार्यक्रम घेतल्याने मतदार याद्यांबाबत फारश्या तक्रारी आल्या नाहीत. परंतु ज्या तक्रारी आल्या त्यावर कारवाई करुन येत्या काळात अशी एकही तक्रार येणार नाही याकडे लक्ष देण्यात येणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये एक व्यक्ती भाजपाला मतदान करा असे सांगत असल्याचे समाेर आले हाेते. परंतु त्याबाबत अद्याप कुठलिही रितसर तक्रार आलेली नाही. जाेपर्यंत तक्रार येत नाही ताेपर्यंत ती तक्रार घेतली जात नाही. परंतु मीडियाकडे नाेंदविलेल्या तक्रारींची आम्ही दखल घेतली आहे. तसेच या प्रकरणी चाैकशीचे आदेश दिले आहेत. एकेठिकाणी मतदान एका पक्षाला आणि मतदान दुसऱ्याला गेल्याची तक्रार आली आहे. अशा परिस्थितीत कायद्यात तरतूद असून त्या व्यक्तीकडून टेस्ट मतदान करण्यात येते. अशावेळी अधिकाऱ्यांच्या समक्ष त्या व्यक्तीला मतदान करावे लागते. याप्रकरणी ही तक्रार खाेटी असल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे यावर काेणती कारवाई करण्यात येईल हे नंतर ठरविण्यात येणार आहे. व्हिव्हीपॅट फार कमी प्रमाणात खराब झाले. दाेन टक्क्यांहून कमी हे मशीन खराब झाले. त्यावर तात्काळ कारवाई करत ते दुरुस्त करण्यात आले.
बारामतीमध्ये पाच वाजेपर्यंत 56 टक्के मतदान झाले हाेते. 6 वाजेपर्यंत ही टक्केवारी 60 च्या पुढे जाईल. बारामतीमध्ये कुठलिही तक्रार आलेली नाही. असेही राम यांनी स्पष्ट केले.