पुणे : राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने ‘धर्मादाय रुग्णालये गरीब रुग्णांच्या दारी’ या उपक्रमांतर्गत रविवारी राज्यातील 53 हजार गरीब रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातून काही रुग्णांना कर्करोग व ह्रदयविकार असल्याची माहिती समोर आली. तसेच पैसे नसले तरी धर्मादाय रुग्णालयांमधून गरीब रुग्णांना सुध्दा पंचतारांकित सुविधासह उपचार घेता येतात,असा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.
धर्मादाय रुग्णालयांतील उपचाराबाबत जनतेमध्ये जागृती व्हावी.त्याचप्रमाणे धर्मादाय रुग्णालयांना सुद्धा त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी,या उद्देशाने धर्मादाय आयुक्तालयाच्या वतीने रविवारी (दि.३)राज्यात ‘धर्मादाय रुग्णालये गरीब रुग्णांच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील ५३ हजाराहून अधिक गरीब रुग्णांची तपासणी करण्यात आली. पुणे विभागात सर्वाधिक २६ते २७ हजार रुग्णांची तपासणी झाली. त्यात पुणे व पिंपरी चिंचवड शहर परिसरात सुमारे १७ हजार रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
चांगले आरोग्यदायी जीवन मिळणे, हा प्रत्येक रुग्णाचा हक्क आहे. तसेच, पैशा अभावी उपचा न घेऊ शकणाºया गरीबांना मोफत औषध पुरविणे हा धर्मादाय रुग्णालये स्थापण्यामागचा हेतू आहे. मात्र, गरजू रुग्णांना माहिती नसल्याने धर्मादाय रुग्णालयापर्यंत पोहचता येत नाही.पंचतारांकीत रुग्णालयांत गरीबांवर मोफत उपचार होतात याबाबत शाश्वती नसते.परंतु,धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या कर्तव्याची आणि रुग्णांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देण्यासाठी राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या पुढकाराने ही मोहीम राबविण्यात आली.
ताडीवाला रस्त्या परिसरातील महात्मा फुले शाळा येथील रुबी हॉस्पिटलच्या आरोग्य तपासणी केंद्रावर या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या हस्ते झाले.तसेच लक्ष्मीनगर झोपडपट्टी,संत तुकाराम नगर, भवानी नगर आदी केंद्रांनाही भेट देवून डिगे यांनी पुण्यातील गरीब रुग्णांची संवाद साधला.
दरम्यान,पुण्यातील रुबी,जहांगिर, एन. एम. वाडिया, केईएम, दिनानाथ मंगेशकर, भारती विद्यापीठ, पूना हॉस्पिटल,डी.वाय.पाटील अशा तब्बल ५९ रुग्णालयांनी या मोहिमेत सहभाग घेतला,असे सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी नमूद केले.तसेच राज्यातील विविध आरोग्य तपासणी केंद्रावर कर्करोग व ह्रदयविकार असणारे रुग्ण निदर्शनास आले.त्यामुळे या रुग्णांवर योग्य वेळी उपचार करणे शक्य होणार आहे,असेही त्यांनी सांगितले.
गरीब रुग्णांच्या आरोग्य तपासणीची विभाग निहाय आकडेवारी विभागाचे नाव रुग्णांची संख्या
पुणे २६,७४२
अमरावती ५,९३५
कोल्हापूर ५,४३३
औरंगाबाद ४,८४७
ठाणे ३,२००
नाशिक २,३२५
लातूर २,४६९
नागपूर १,७२०
-----------------------------राज्यातील कोणीही गरीब नागरिक केवळ पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना बरोबर घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.राज्यातील 53 हजाराहून अधिक रुग्णांना त्याचा लाभ घेता आला. गरीब रुग्णांना सुध्दा पंचतारांकित रुग्णालयात उपचार मिळू शकतात, याविषयी या उपक्रमातून जागरूकता निर्माण झाली.- शिवकुमार डिगे, धर्मादाय आयुक्त