पुणे : रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरी घेण्यास शासनाने परवानगी दिली आहे. जिल्ह्यात ५४ प्रस्ताव जिल्हा परिषदेला या अंतर्गत प्राप्त झाले आहे. मात्र, या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी न मिळाल्याने हे प्रस्ताव अद्यापही मंजूर झालेले नाहीत.
जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरी घेण्यास अनेक शेतकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. यासाठी ५० फुटांपर्यंत १०० टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळते. त्यानुसार आपल्या शेतात विहिरी खोदण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठवले. रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे होणार असल्याने ती चांगली होतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दौंड तालुक्यातून ६, शिरूर तालुक्यातून ११, भोर तालुक्यातून १, हवेली तालुक्यातून २, मावळ तालुक्यातून १७, इंदापूर तालुक्यातून १, जुन्नर तालुक्यातून २ असे ५४ प्रस्ताव जिल्हा परिषदेला मिळाले आहेत. मात्र, यातील ११ प्रस्ताव हे भूजल पातळी खाली गेलेल्या ठिकाणचे आहे. शासकीय नियमानुसार अशा प्रस्तावांना मान्यता देता येत नाही. यामुळे यावर पुन्हा विचार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. तर इतर प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी न मिळाल्याने ते प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाही. हे प्रस्ताव लवकर मंजूर व्हावे व कामाला सुरुवात व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
---
मावळ तालुक्यातून सर्वाधिक प्रस्ताव
जिल्ह्यात मावळ तालुक्यातून सर्वाधिक सिंचन विहिरींचे सर्वाधिक प्रस्ताव मिळाले आहे. मात्र, त्याला मंजुरी न मिळाल्याने रोहयोतून विहिरींची कामे कधी सुरू होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. तर बारामती, खेड, भोर, वेल्हा तालुक्यातून एकही प्रस्ताव या साठी दाखल झालेले नाही.
----
तालुकानिहाय आलेले प्रस्ताव
दौंड ६, शिरूर ११, मुळशी १४, भोर १, हवेली २, मावळ १७, इंदापुर १, जुन्नर २ एकूण ५४
कोट :
जिल्हातील काही गावांत भूजल पातळी खूप खालावली आहे. यामुळे या ठिकाणी विहिरी खोदता येत नाही. यामुळे यातील काही प्रस्तावांना अद्यापही मंजुरी दिलेली नाही.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी