वेळ - ११.०५
पहिल्या पाच आरोग्य सेवकांचा सत्कार : पालिका आणि रुग्णालय प्रशासनाकडून चोख व्यवस्था
पुणे : शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास शनिवारी सकाळी अकरा वाजता सुरुवात करण्यात आली. कात्रज येथील भारती हॉस्पिटलमध्ये ११ वाजून ०५ मिनिटांनी पहिल्या लाभाथ्यार्ला लस देण्यात आली. दिवसभरात १०० पैकी ५४ डॉक्टरांनी लस घेतली. उर्वरीत ४६ जणांपैकी काही जण अनुपस्थित राहिले. तर काही जणांनी लस घेण्यास नकार दिला. लस घेणे ऐच्छिक असल्यामुळे प्रशासनानेही कोणावरही दबाव टाकला नाही.
भारती हॉस्पिटल मधील १०० डॉक्टरांना लस देण्यात येणार होती. डॉ. अनुज दरग यांना ११ वाजून ०५ मिनिटांनी पहिली लस देण्यात आली. त्यानंतर डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. सुमिरन महाजन, डॉ. दिनेश श्रीहरी आणि डॉ. सायली देशपांडे या पाच जणांना लस देण्यात आली. यावेळी महापालिकेच्या क्षेत्रीय आरोग्य अधिकारी डॉ. विद्या नागमोडे, भारती हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. संजय ललवाणी यांच्यासह नर्स उपस्थित होत्या. यावेळी रुग्णालय प्रशासन आणि महापालिकेकडून लसीकरणाची चोख व्यवस्था करण्यात आलेली होती. लसींचा पुरेसा साठा देण्यात आलेला होता. त्यासाठी डॉक्टर, पाच नर्स, डाटा एंट्री आॅपरेटर, सुरक्षा रक्षक यांची व्यवस्था करण्यात आली होती. लसीकरणानंतर जर लाभाथ्यार्ला काही त्रास झालाच तर खबरदारीचा उपाय म्हणून आॅक्सीजन सिलेंडर, आपत्कालीन बेड, आदींची व्यवस्था करण्यात आली होती. लसीकरणानंतर लाभार्थ्यांना तीस मिनिटे निरीक्षणामध्ये ठेवण्यात आलेले होते. सुदैवाने एकाही लाभार्थ्याला कोणताही त्रास लसीकरणानंतर जाणवला नाही. निरीक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे डॉक्टर आपापल्या कामावर पुन्हा रुजू झाले.
====
भारती विद्यापीठ पहिले पाच लाभार्थी (कंसात वेळ)
१. डॉ. अनुज दरग (११.०५)
२. डॉ. गिरीश कुलकर्णी (११.१०)
३. डॉ. सुमिरन महाजन (११.१५)
४. डॉ. दिनेश श्रीहरी (११.१६)
५. डॉ. सायली देशपांडे (११.२३)
====
रुग्णालयात लसीकरण कक्षाची दिशा दर्शविणारे फलक लावण्यात आलेले होते. तसेच रांगोळी काढून सकारात्मक वातावरण निर्मितीचा प्रयत्नही करण्यात आला होता. महापालिकेचे अधिकारी आणि रुग्णालयाचे अधिकारी लस लाभार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत होते. यावेळी नगरसेवक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी पहिल्या पाच लाभार्थ्यांचा सत्कार केला.
====
लस घेताना मनामध्ये काही प्रमाणात भिती होती. परंतु, आपल्या देशात लस निर्मिती झाल्याचा आनंदही होता. लस घेतल्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही. देशातील प्रत्येक नागरिकाने लस घेणे आवश्यक आहे. ही वैद्यकीय क्षेत्रातील एक क्रांती आहे.
- डॉ. अनुज दरक, भारती हॉस्पिटल (पहिले लाभार्थी)
====
सिरमने तयार केलेल्या लसीची क्लिनिकल ट्रायल भारती हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. देशात पहिली लस पुण्यातल्याच नागरिकाला देण्यात आलेली होती. आरोग्य सेवकांना आज लस मिळतेय ही भाग्याची गोष्ट आहे. शासनाने देशातील तीन कोटी आरोग्य सेवकांना लस द्यायच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. शासनाच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. अफवांवर विश्वास ठेऊ नये.
- डॉ. संजय ललवाणी, संचालक, भारती हॉस्पिटल
(फोटो - लक्ष्मण लॉगिनमध्ये)