पुणे : गॅस एजन्सीमध्ये रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यावधींची बेकायदेशीरपणे ठेवी घेऊन लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी (वय ६५) आणि त्यांचा मुलगा मयुरेश उदय जोशी (वय ४६, रा. पानमळा) यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ९ जणांची ५ कोटी ५३ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर आल्या असून जवळपास १०० जणांची फसवणूक केली असल्याचे समजते.याबाबत मंगेश जगदिश खरे (रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै २०२१ ते ६ डिसेबर २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय जोशी हे सदाशिव पेठेतून भाजपचे नगरसेवक होते. महिला आरक्षणानंतर त्यांच्या पत्नीही नगरसेविका होत्या. त्यांच्या मुलगा मयुरेश जोशी याला गॅस एजन्सी मिळाली होती. त्याच्या श्रीराम गॅस एजन्सीमध्ये रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याचे आमिष उदय जोशी याने दाखविले. फिर्यादी यांनी ९ लाख १० हजार रुपये गुंतविले. तसेच फिर्यादीचे आईचे बँक खात्यातून ५ लाख रुपये श्रीराम गॅस एजन्सीत गुंतविले. मयुरेश जोशी याने रिझर्व बँक ऑफ इंडियाची कोणतीही परवानगी नसताना वार्षिक १२ टक्के व्याजाच्या खोट्या एफडी सर्टिफिकेटस फिर्यादीला दिल्या. त्यावर आजपर्यंत कोणताही परतावा न देता, फिर्यादीची १४ लाख १० हजार रुपयांची फसवणुक केली.
फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पैसे परत मागितले असता त्यांना तुला तुझ्या जीवाची भिती वगैरे वाटत नाही काय अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्याप्रमाणे उदय जोशी यांनी अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे. त्यापैकी फिर्यादी अन्य ८ जणांनी पुढे येऊन तक्रारी दिल्या असून त्यांची ५ कोटी ५३ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. जवळपास १०० जणांची २५ कोटी रुपयांवर फसवणूक झाल्याचे सांगितले जात आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून पोलीस निरीक्षक मोरे तपास करीत आहेत.