मुंढवा : केशवनगर भागात बेकायदेशीर नळजोडच्या खोदाईमुळे महावितरण कंपनीची भूमिगत एसटी केबल तुटल्यामुळे येथील वीज ग्राहकांना या मे महिन्यात एकूण ५५ तासांपेक्षा जास्त वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. येथील स्थानिक रहिवाशी मात्र महावितरण कंपनीवर नाराज झाले आहेत. केशवनगर भागात बेकायदेशीर नळजोड घेतले जात असले तरी पाणीपुरवठा विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करीत आहे, असा खडा सवाल येथील नागरिक करीत आहेत. केशवनगरमध्ये बेकायदेशीर नळजोडचा सुळसुळाट असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरीत आहे.
केशवनगर भागात बोल्हाईमाता मंदिराजवळ बेकायदेशीर नळ कनेक्शन घेताना महावितरणची भूमिगत एसटी केबल दोन वेळा तुटली. तसेच ओव्हरलोडमुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे. तसेच ट्रान्सफॉर्मर जळाल्याने स्थानिक रहिवाश्यांना या मे महिन्यात ५५ तासांपेक्षा जास्त वेळ वीज नसल्याने लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक तसेच सरकारी धोरणाप्रमाणे “वर्क फ्रॉम होम” करणाऱ्या युवक युवती कामगारांना कामात अडथळे निर्माण झाले. तसेच ओढा-नदीकाठी परिसर असल्याने मच्छरांचा त्रास त्यात कोरोना रुग्ण अशा सर्वांना खंडित वीज पुरवठा झाल्याने मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत करावा केशवनगरची समस्या सोडवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. ज्येष्ठ नागरिक रंगनाथ देंडगे, सागर जवळकर, सुजित कसबे, मंगेश मोहिते, रमेश जाधव, ऋषिकेश काटे, सुमित देंडगे, कुणाल डोईफोडे, पद्मसिंह घोरपडे, गणेश रणसिंग, दिलीप भंडारी,अनिल भांडवलकर यांनी समस्या सोडविण्याची विनंती केली आहे.
नागरिकांच्या प्रतिक्रिया-
संदीप फलके- अनधिकृत नळकनेक्शनच्या खोदाईमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने हजारो नागरिकांना, कोरोना रुग्ण, ज्येष्ठ आजारी महिला व पुरुषांना, लहान मुलांना मच्छरांनी फोडले. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांसह वीज
पुरवठा अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
पद्मसिंह घोरपडे- शासनाच्या धोरणाप्रमाणे “वर्क फ्रॉम होम” चालू आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने काम वेळेत पूर्ण न झाल्याने अत्यावश्यक सेवा पुरवण्यात महावितरणमुळे अपयश. वीज मंत्र्यांनी “वर्क फ्रॉम
होम”चा फज्जा होत असल्याने लक्ष घालावे.
अक्षय लांजुलकर- घरून काम चालू असल्याने कामे वेळेत पूर्ण होत नाही. महिलांना वीज नसल्याने पाणी भरण्यास अडचणी होतात. वीजपुरवठा सुरळीत करावा. अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
वीजपुरवठा खंडित झालेले दिवस
१ मे– १२ तास वीज खंडित
८ मे- १२ तास वीज खंडित
१७ मे-१२ तास वीज खंडित
१८ मे- ५ तास वीज खंडित
१९ मे- १४ तास वीज खंडित
लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता इंद्रजित देशमुख म्हणाले, आम्ही या कालावधीत नवीन नळजोड कनेक्शनसाठी कोणत्याही प्रकारच्या खोदाईसाठी परवानगी दिलेली नाही. याबाबत मी चौकशी करतो.
महावितरण मगरपट्टा विभागाचे अभियंता अक्षय जगताप यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
फोटो ओळः- केशवनगर येथील बोल्हाईमाता मंदिर येथे मुख्य रस्त्यावर महावितरण कंपनीची भूमिगत एसटी केबल तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.