लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये ५५ हजार २८७ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. त्यानुसार या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी दि.२० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असेल; अन्यथा या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील इयत्ता अकरावीची केंद्रीय पद्धतीने आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविली जात आहे. या प्रक्रियेतील पहिली फेरी पूर्ण झाली असून, सध्या दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या फेरीत २४ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये अद्याप विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग १ व २ भरणे, अद्याप अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना दोन्ही भाग भरून तो पूर्ण करणे व २ ते १० क्रमांकाच्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळूनही तो अंतिम न केलेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यानुसार दि. १८ जुलैपर्यंत अर्ज भरणे व बदल करण्याची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत नव्याने आलेले अर्ज, अर्जातील बदल केलेले ५५ हजार २८७ विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष दिनकर टेमकर यांनी दिली.पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी दि.२० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता प्रवेशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना सायंकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे, हे संकतेस्थळावर पाहता येईल. गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेले असल्यास, त्या सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असेल. या विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही; तसेच दिलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दि.२१ ते २४ जुलै या कालावधी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल, असे टेमकर यांनी स्पष्ट केले.अकरावी प्रवेशाची स्थितीएकूण प्रवेश क्षमता - ९१,६७०एकूण अर्ज प्राप्त (पहिली फेरी) - ७८,४३८पहिल्या गुणवत्ता यादीत दिलेले प्रवेश - ४८,२५०पहिल्या गुणवत्ता यादीनुसार झालेले प्रवेश - २४,६६३पहिल्या फेरीत रद्द केलेले प्रवेश - ३२५पहिल्या फेरीत नाकारलेले प्रवेश - ७४महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले - २३,१८८दुसऱ्या फेरीसाठी पात्र विद्यार्थी संख्या - ५५,२८७
अकरावी दुसऱ्या फेरीसाठी ५५ हजार विद्यार्थी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 5:21 AM