पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम ए मराठीसाठी चक्क ५६ वर्षीय विद्यार्थिनीला चार सुवर्णपदक मिळाली आहेत. कला, साहित्य आणि लिखाण यांची आवड असणाऱ्या पुण्यातील नीलिमा फाटक यांचे सर्वच स्तरावर कौतुक होऊ लागले आहे.
वयाच्या ते ३० वर्षांपर्यंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षणात रस दाखवतात. तसेच आवर्जून पद्ययुत्तर पदवीसाठी प्रवेश घेतात. त्यांनतर नोकरी, व्यवसायात गुंतल्यावर पुन्हा शिक्षणाकडे शक्यतो वळत नाहीत. पण फाटक यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर बँकेत ३० वर्ष नोकरी करून एम ए मराठीला प्रवेश घेतला. त्यामध्ये मन लावून अभ्यास करत चार सुवर्णपदक मिळवल्याची उत्तम कामगिरी दाखवली आहे.
नीलिमा फाटक यांनी रामकृष्ण मोरे आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स या महाविद्यालयात वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर वकिलीचे शिक्षणही केले. त्यांना आधीपासूनच कविता लेखन, साहित्य वाचनाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या बँकेत नोकरीसाठी रुजू झाल्या. पण त्यांनी आपले लिखाण, वाचन , कवितालेखन हे छंद थांबवले नाहीत. कामातून वेळ मिळाला की त्या साहित्यात गुंतून जात असे. कविता लिहिण्याचा छंद कधीही थांबून दिला नाही. अखेर त्याचे फळ म्हणून २०१९ साली 'निलमाधव' नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. जपानमध्ये १८ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तेव्हाच करम व रंगतसंगत प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना पारंपरिक व उच्चशिक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. समाजकार्य म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे संगोपन करत असलेल्या स्नेहवन संस्थेशी या संलग्न आहेत.
फाटक म्हणाल्या, तीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी केली. त्यानंतर वयाच्या ५४ व्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेतली. शालेय जीवनापासूनच मला वाचन आणि कविता लेखनाची आवड होती. महाविद्यालयीन जीवनातही मी लिखाण थांबवले नाही. माझी एक कविता मॉरिशसमधील इयत्ता नववीच्या मराठी अभ्यासक्रमात आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर बँकेत नोकरीला लागले. पण एम ए मराठी करण्याचे ठरवले होते. नोकरीच्या ३० वर्षांमध्ये मराठी साहित्याकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. एका बाजूने लिखाणाचे कार्य सातत्याने चालू होते. त्याचेच फळ म्हणून आता मला पुणे विद्यापीठातून चार सुवर्णपदक मिळाली आहेत. माझी पीएचडी करण्याची पण इच्छा आहे. आताच मी सेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. विद्यापीठात पीएचडी साठी प्रवेशही घेतला आहे.