पुणे : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे येत्या १ ऑगस्ट रोजी लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीमध्ये दाखल आणि दाखलपूर्व असे जिल्हयातील ५६ हजार दावे ठेवले जाणार आहेत. यापूर्वी १० एप्रिल रोजी होणारी राष्ट्रीय लोकअदालत पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे या वर्षीची ही पहिलीच लोकअदालत आहे.
न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी लोक अदालतीचे कामकाज हे प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने होणार आहे. दावे निकाली काढण्यासाठी प्रमुख न्यायाधीशपदी एस. ए. देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार ४५ पॅनेल तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
कंपनी पक्षकारांशी संपर्क करून त्यांची आॅनलाईन साठी परवानगी घेतल्यानंतर त्यांना ओटीपी पाठवला जाईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, छोट्या छोट्या प्रकरणासाठी दि.29 ते 31 जुलै दरम्यान विशेष मोहीम राबविली जाणार आहे. प्रि-लिटीगेशनचा निपटारा करण्यासाठी 4 अतिरिक्त पँनेलची नियुक्ती करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
-----------------------------------
न्यायालये पूर्ण क्षमेतेने सुरू नसल्याचा त्याचा परिणाम दाव्यांच्या सुनावणीवर झाला आहे. संकट काळात जवळचा माणूस किती महत्त्वाचा असतो हे नागरिकांना समजले आहे. त्यामुळे वाद दूर ठेवून तडजोडीने प्रकरण मिटविले तर आपापसातील हेवेदावे राहाणार नाहीत. त्यामुळे वाद मिटवण्याची भावना वाढली आहे. लोकअदालतीत वाद मिटला तर वाचलेला वेळ आणि खर्च कुटुंबासाठी वापरता येईल. त्या अनुषंगाने दावे लोकअदालतीत ठेवले आहेत.
- प्रताप सावंत, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
-----------------------