पुणे/उरुळी कांचन: हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे निवडणुकीत खरी लढत दुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काही जागांसाठी अपक्षांनी बंडखोरी केली आहे, तर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन दोन पॅनलची निर्मिती करून, ६ जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे प्रमुख पॅनलची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, शुक्रवारी चिन्ह वाटप झाले असून, निवडणूक चांगलीच रंगात आली आहे.
हवेली बाजार समिती निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नाराजांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीला मोठी धावपळ करावी लागली. शेवटच्या क्षणाला आमदार अशोक पवार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना नाराजांना पुन्हा राष्ट्रवादीत ठेवण्यात यश मिळाले. त्यासाठी भविष्यातील तडजोडही करावी लागली. त्यामुळे राष्ट्रवादी पुरस्कृत आप्पासाहेब मगर सहकारी पॅनल व भाजपचे सर्व पक्षीय अप्पासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी यांच्यामध्येच खरी लढत होणार, असे चित्र निर्माण झाले होते.
भाजप नेते प्रदीप कंद यांनी अपक्ष, तसेच काही राष्ट्रवादीच्या नाराजांना आपल्या गोटात आणण्याचा प्रयत्न केला, पण तो अपवाद वगळता यशस्वी झाला नाही. बाजार समितीसाठी गुरुवारी (दि. २०) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी १९५ पैकी १३८ जणांनी अर्ज माघारी घेतले आहे. त्यामुळे एकूण १८ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असून, यात अपक्षांची संख्या १५ आहे.
असे आहेत उमदेवार
सेवा सहकारी संस्था ११ जागा २९ उमेदवारसर्वसाधारण गट: ७ जागा २१ उमेदवार
महिला राखीव : २ जागा ४ उमेदवारइतर मागासर्वगीय व भटक्या विमुक्त: २ जागा २ उमेदवार (प्रत्येकी एक)
ग्रामपंचायत: ४ जागा ११ उमेदवारआडते - व्यापारी: २ जागा १२ उमेदवार
हमाल- मापाडी: १ जागा ५ उमेदवारव्यापाऱ्यांकडून दोन पॅनलची निर्मिती
बाजार समिती निवडणुकीत दोन्ही प्रमुख पॅनलची व्यापारी आडते आणि हमाल मापारी गटात एकही उमेदवार दिला नाही. विशेष म्हणजे, या दोन ठिकाणी राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. त्यामुळे इथे कोणीही निवडून आले, तरी त्यांच्याकडून राष्ट्रवादीला झुकते माप मिळणार, अशी चर्चाही सुरू झाली आहे. बाजार समितीत असणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी दोन स्वतंत्र पॅनलची निर्मिती केली आहे. जय शारदा गजानन पॅनल व जनशक्ती पॅनल अशी दोन नवी पॅनल निर्माण झाली असून, त्यांनी सहा जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामध्ये व्यापारी आडते व हमाल मापारीसह अन्य काही जागांवर या दोन्ही पॅनलचे उमेदवार लढणार आहेत.
निवडणुकीसाठी शुक्रवारी चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी चार पॅनलचे एकच चिन्ह मागितले. त्यानंतर, नियमानुसार त्या चिन्हाचे वाटप केले, तसेच १५ अपक्ष उमेदवारांनाही वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे देण्यात आली.