जेजुरी - महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीतील खंडोबा मंदिर देवसंस्थानाचे उत्पन्न वाढले आहे. डिसेंबर महिन्यात ते ५७ लाख रुपये होते. मात्र, मुख्य गाभा-याच्या दानपेटीत अजूनही नोटाबंदी केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा आढळून येत आहेत. या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न व्यवस्थापनाला पडत आहे.मुख्य मंदिरांसह इतर देवालयांतील दानपेट्या फोडून रकमेची मोजदाद करीत असताना नोटाबंदी करण्यात आलेल्या ५०० रुपयांच्या १२ नोटा व १००० हजारांच्या ४ नोटा, असे एकूण १० हजार रुपये मिळून आले. भाविकांनी केलेले दान गुप्त असल्याने या नोटा नेमक्या कोणत्या भाविकाने देवाला अर्पण केल्या ते समजू शकले नाही. दानपेटीतील रकमेची मोजदाद करताना मुख्य विश्वस्त राजकुमार लोढा व व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक कैलास महाले यांच्यासह इतर सर्व विश्वस्त उपस्थित होते.डिसेंबर महिना हा शालेय सुट्या व सहलींचा काळ असल्याने भाविकांची कमालीची गर्दी होती. धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव कचरे यांनी येथील व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी कैलास महाले यांची निरीक्षक म्हणून तात्पुरती नियुक्ती केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी येथील व्यवस्थापन उत्पन्नवाढ विशेषत: दर्शनपासावर लक्ष केंद्रित केल्याने देवसंस्थानाचे उत्पन्न कमालीचे वाढले आहे. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी दर्शनपास माध्यमातून २५ लाख ५४ हजार रुपये, पावती दानातून ९ लाख ५१ हजार, भक्त निवासमधून २ लाख ५७ हजार, मुख्य मंदिर दानपेटीतून १९ लाख ४० हजारांचे असे एकूण ५७ लाख रुपयांचे उत्पन्न डिसेंबर महिन्यात देवसंस्थानाकडे जमा झाले आहे. व्यवस्थापन व्यवस्था बळकट केली तर उत्पन्नात वाढ होऊ शकते, हे प्रकर्षाने समोर आले. याबाबत मागील काळात गैरवर्तन करणा-या काही कर्मचाºयांवर कारवाईदेखील करण्यात आली.या नोटांचे करायचे काय ?या देणगी दानाचा आदर-सन्मान ठेवून पुढील काळात जास्तीत जास्त भाविकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात येऊन अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात येईल, असा निर्णय सर्व विश्वस्त मंडळाने घेतला आहे. मात्र, नोटाबंदीनंतरही जुन्या नोटा भाविकांकडून दानपेटीत टाकल्या जातात. या नोटांचे नेमके करायचे काय? असा प्रश्न संस्थानसमोर आहे, असे विश्वस्त पंकज निकुडे यांनी म्हटले आहे.खंडोबा मंदिरातील दानपेटीत सुट्यानाण्यांसह १० व २० रुपयांच्या नोटा जास्त संख्येने मिळून येतात, याचाच अर्थसर्वसामान्य गोरगरीब भाविक मोठ्या श्रद्धेने येथे आपल्या स्वकमाईतील काही भाग देवाला अर्पण करतात.
देवसंस्थानाचे उत्पन्न ५७ लाख रुपये; जुन्या नोटा आजही दानपेटीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 2:45 AM