पुणे : शहर पोलीस दलातील ५७५ पोलीस अंमलदारांना पोलीस नाईक ते सहायक पोलीस फौजदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये २०० पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस फौजदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. २४९ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. १२६ पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यापूर्वी या वर्षामध्ये फेब्रुवारी व एप्रिलमध्ये १७२ अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली होती. कोविड १९ मुळे पदोन्नती प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे प्रथमच एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण, प्रशासकीय अधिकारी शशिकला भालचिम यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या वतीने पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार यांना बुधवारी पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती झालेले पोलीस अंमलदार यांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त प्रशासन डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे व इतर पोलीस अधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.