आंबेगाव तालुक्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग धोकादायकरित्या वाढला आहे. मागील दहा दिवसांत तब्बल ५८२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यामध्ये मंचर शहरातील १५२ रुग्णांचा समावेश आहे.२५ जणांचा कोरोणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
वाढत्या कोरोनामुळे काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचा परिणाम बाजारपेठांवर झालेला दिसतो. मंचर शहरात होणारी गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे व्यवसाय सुद्धा थंडावले आहेत. रविवारी आठवडे बाजार बंद असल्याने त्याचा परिणाम आर्थिक उलाढालीवर झाला आहे. लॉकडाऊन नंतर व्यवहार सुरळीत झाले. त्यानंतर अर्थव्यवस्था काहीशी पटरीवर येऊ लागली होती.
मात्र, आता पुन्हा एकदा आर्थिक गणित बिघडू लागले आहे. व्यवसाय सर्वत्र सुरू आहेत. मात्र कोरोनामुळे नागरिक बाजारात येण्यास टाळाटाळ करू लागले आहेत. परिणामी, व्यवहार थंडावले आहेत. सध्या रिकाम्या एसटी गाड्या धावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
एरवी गजबजलेले मंचर एसटी बस स्थानक आता रिकामेच असते. यावरून नागरिक कोरोनाच्या भीतीने जास्त प्रमाणात फिरत नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन होण्याची भीती नागरिकांच्या मनामध्ये आहे. वाढत्या कोरोणा रुग्णसंख्यामुळे शासनाने जर लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर मात्र सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्यामुळे प्रशासन सुद्धा हतबल झाले आहे. नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसते. त्यामुळे कोरोना अजून वाढू लागला आहे. आगामी काळात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध वाढण्याची शक्यता असल्याने व्यवसायिक काळजीत पडले आहेत. वाढत्या रुग्ण संख्येचा ताण आरोग्य यंत्रणेवर आला आहे. काही रुग्णांना बेड मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत.
----
चौकट
रुग्णांची वाढती संख्या अशी
जानेवारी, फेब्रुवारी या महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. २१ मार्चला ४० रुग्ण, २२ मार्च ३८ रुग्ण, २३मार्च ६१, २४ मार्च ४६, २५ मार्च ४७,२६ मार्च५५, २७मार्च६१, २८ मार्च ७०,२९ मार्च ९१ व ३० मार्च ७३ रुग्ण याप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या सहा हजाराच्या पुढे गेली आहे.
--