पुणे: सहकारमंत्र्यांचे सचिव असल्याचे सांगून गृहकर्ज कमी करुन देतो, तसेच लिलाव झालेला बंगला परत मिळवून देतो, असे सांगून एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला तिघांनी तब्बल ५९ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत येरवडा येथील एका ५९वर्षाच्या नागरिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोरख तनपुरे (वय ४०), विशाल पवार (वय ३५, दोघे रा. हडपसर), गगन केशव रहांडगळे (वय ३८, रा. नागपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कल्याणीनगरमध्ये ऑक्टोबर २०२१ ते आतापर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिलायन्स कंपनीतून सेवानिवृत्त असून त्यांची २ मुले अमेरिकेत नोकरी करतात. त्यांनी वाघोली येथे बंगला विकत घेण्यासाठी एच डी एफ सी बँकेकडून ३ कोटी ३० लाखांचे कर्ज घेतले होते. कोरोनाच्या काळात गृहकर्जाचे हप्ते थकले. तेव्हा त्यांनी बंगला विकण्याचा निर्णय घेतला. त्यातून त्यांची इस्टेट एजेंट गोरख तानपुरे, विशाल पवार यांच्याशी ओळख झाली. बँकेने घरावर जप्ती आणल्याने त्यांना बंगला विकणे अवघड झाले. कर्जाची रक्कम ४ कोटी ८० लाख रुपये झाली. गोरख तनपुरे व विशाल पवार यांनी गगन रहांडगळे हा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे सचिव असल्याचे खोटे सांगून ओळख करुन दिली. त्याने बँकेचे गृहकर्ज कमी करुन देतो, त्यासाठी आम्हाला ३० लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यापैकी २५ लाख रुपये रहांडगळे याला दिले. मात्र, पैसे दिल्यानंतरही त्यांचे कर्ज कमी झाले नाही. शेवटी जप्ती केलेला बंगल्याची ५ कोटींना विक्री झाली. बंगला विकत घेणाऱ्यांचा मंत्रीशी परिचय असून ते लिलाव झालेले घर त्यांना परत मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून ५९ लाख रुपये घेतले.
आघाडी सरकार पडल्याचा घेतला फायदा
त्यांच्या बंगल्याच्या लिलावासाठी संबंधितांनी ३० लाख रुपये स्टॅम्प डयुटी भरली आहे. ती द्यावी लागेल. मुले करारनाम्याला हजर राहून शकत नसल्याने जिल्हाधिकारी यांना मॅनेज करण्यासाठी २ लाख रुपये त्यांच्याकडून घेतले. परंतु, पैसे घेतल्यानंतरही ते कारणे सांगून करारनामा करण्याची टाळाटाळ करत होते. दरम्यान, जून २०२२ मध्ये आघाडी सरकार पडले. ते कारण सांगून पुन्हा त्यांनी टाळाटाळ सुरु केली. त्यांनी आपल्या वकीलाला हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी चौकशी केल्यावर असा कोणी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सचिव नसल्याचे समजले. फिर्यादी यांनी नोटीस पाठविल्यावर गगन रहांडगळे याने फोन करुन मी साहेबांची वेगळी कामे करतो. त्यामुळे माझी ओळख कोणी सांगणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांना गगन रहांडगळे याच्यावर नागपूरमध्येही फसवणूकीचा गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.