मोरगाव : शिवसेना पुणे जिल्हा सह संपर्क प्रमुख ॲड राजेंद्र काळे यांसह बारामती तालुक्यातील शिवसेनेचे ५९४ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांच्यासोबत एकसंध राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधात शिवसेनेच्या विविध शाखांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्रे तयार केली आहेत.
शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेची एकनाथ शिंदे गट व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अशी विभागणी झाली आहे. पक्षाच्या झालेल्या विभागणीमुळे बारामती तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ५९४ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्रे तयार केली आहे. यामध्ये युवासेना व फादर बॉडीचा समावेश आहे.
बारामतीचे ॲड राजेंद्र काळे सहसंपर्क प्रमुख पुणे जिल्हा ,विश्वास मांढरे तालुकाध्यक्ष, उपतालुका प्रमुख मंगेश खताळ, सुदाम गायकवाड, अजित जगताप, वाहतूक सेना पुणे जिल्हा प्रमुख दत्तात्रय लोणकर, युवा सेना चिटणीस परेश भापकर यांनी प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. तसेच तालुका महिला आघाडी, सहकार सेना यांनीही शिवसेना प्रमुख यांच्याबरोबर एकसंध राहण्याचा निर्णय घेतला .