पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीपरीक्षा गेल्या काही महिन्यांपासून टीईटी प्रवेशाच्या घोटाल्यामुळे रखडली होती. मात्र ही परीक्षा आता येत्या 20 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हांमध्ये एकाच दिवशी घेतली जाणार आहे.
कोरोनामुळे मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा लांबली होती. विद्यार्थ्यांना विनाकारण अनेक महिने या परीक्षेचा अभ्यास करावा लागला होता. 2022 मधील शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच व्हावी यासाठी परीक्षा परिषदेने आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. मात्र टीईटी परिक्षेतील घोटाळ्यात 'विनर' कंपनीचे नाव आल्यामुळे शासनाने या कंपनीच्या सहकार्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, विनर कंपनीने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने विनर कंपनीच्या बाजूने निकाल दिला. परिणामी परीक्षा परिषदेला आता विनरच्या सहकार्याने शिष्यवृत्ती परीक्षा घ्यावी लागणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने अर्ज भरणयासाठी आवश्यक कालावधी दिला होता. परंतु काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थी 23 ते 30 एप्रिल या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज भरू शकणार आहेत. 30 एप्रिलनंतर परीक्षेसाठी अर्ज भरता येणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा दराडे यांनी स्पष्ट केले आहे.