लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २४) दिवसभर शिवसेनेने शहरात ६ ठिकाणी आंदोलने केली. त्यात डेक्कनवरील आर. डेक्कन मॉलवर सकाळी दगडफेक करण्यात आली. राणे यांच्या अटकेचा निषेध म्हणून भाजप कार्यकर्त्यांनीही झाशीची राणी चौकात सायंकाळी निदर्शने केली.
जंगली महाराज रस्त्यावरील भाजप कार्यालयाबाहेर काहींनी सायंकाळी ७ च्या सुमारास फटाके फोडले. यामुळे या भागात काही वेळ तणाव निर्माण झाला. भाजप व शिवसैनिकांमध्ये या वेळी घोषणायुद्ध रंगले. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करुन पुढील प्रसंग टाळला. भाजप कार्यालयासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला असून तेथील गल्लीतील रस्ता बंद केला आहे.
डेक्कन जिमखान्यावरील गुडलक चौक, हडपसर, फुरसुंगी, पाषाण येथील शिवाजी चौक, आर. डेक्कन येथे शिवसेनेने आंदोलन केले. पोलिसांनी संपूर्ण शहरात महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. आर. डेक्कन मॉलवर दुचाकीवरुन आलेल्यांनी दगड फेकल्याचे काच फुटली. त्यासंबंधी तक्रार आल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.