लोणी काळभोर : येथील तपास पथकाने पेट्रोल पंपावार दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांचे ४ साथीदार पळून गेले आहेत. पोलिसांनी त्यांचेकडून घातक हत्यारासह ३ दुचाकी असा एकूण २ लाख ५० हजार ३१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी कुणाल नारायण जाधव (वय २२, रा. ओमकार कॉलनी, काळेपडळ, हडपसर, पुणे), ऋषीकेश राजेंद्र बर्डे (वय २१, रा घुंगरवाली चाळ, संतोष नगर, कात्रज, पुणे), विकी धनंजय म्हस्के (वय २९) तेजस उर्फ भैया धनंजय म्हस्के (वय २६, दोघे रा. इनामदारवस्ती कोरेगावमुळ ता.हवेली), केतन गौरव कोंढरे (वय १९, रा. सुजाता बंगला, त्रिमुर्ती चौक, भारती विदयापीठ, पुणे), पुर्वेश शशीकांत सपकाळे (वय २२ वर्षे रा.सर्वे नं. २०४, पापडेवस्ती भेकराईनगर, फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली आहे. तर पृथ्वीराज संजय कांबळे (रा. गणेश दत्तमंदीर, संतोष नगर, कात्रज, पुणे), निखील मारूती शिंदे (पापळ वसाहत, बिबवेवाडी पुणे), अभिषेक बबन गव्हाणे, (सुदाम बिबवेनगर, एसआरएस, गार्डनचे पाठीमागे, गंगाधाम, पुणे) सोनु राठोड, (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) हे तिघे पोलिसांची चाहूल लागून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मार्च रोजी रात्री २ - ३० वाजण्याच्या सुमारांस तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस हवालदार संतोष होले, सुनिल नगालोत, बाजीराव वीर, साळुंके, राजेश दराडे हे घरफोडी प्रतिबंधक कारवाई कामी रात्रगस्त करत असताना दराडे याना बातमीदारामार्फत काही इसम हे लोणी काळभोर, माळीमळा येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील राजेंद्र पेट्रोलपंप लुटण्याचे तयारीत कदमवाकवस्ती गावचे हददीत तुळजाभवानी हॉटेलचे बाजूस पातक हत्यारासह अंधारात थांबले आहेत, अशी बातमी मिळाली. त्यांनी सदरबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोकाशी यांना सविस्तर माहिती कळवली. त्यांनी खात्री करून कारवाई करणेबाबत आदेश दिले.
सदर पथक पहाटे ३-२५ वाजण्याच्या सुमारांस तेथे पोहोचले असता हॉटेलचे बाजूस महामार्गाचे कडेला अंधारात वरील संशयित बाजूला दुचाकी लावून बोलत असताना दिसले. पोलिसांना पाहून ते पळून जावू लागले त्यावेळी त्यातील ६ जणांना पाठलाग करून पकडले. त्यातील ४ जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. चौकशीत त्यांनी पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली आहे. झडतीत त्यांचेकडे लोखंडी कोयते, मिरची पुड, मोबाईलसह १ लाख ५० हजार रुपये किमतीची रॉयल एनफील्ड बुलेट नंबर एमएच.१२ आरझेड ५३९८, ५० हजार रुपये किमतीची होन्डा, ॲक्टीव्हा नंबर एमएच १२ क्युपी ६६१०, ३० हजार रुपये किमतीची टिव्हीएस ज्युपीटर नंबर एमएच १२ टीझेड.२२८७ असा एकूण २ लाख ५० हजार ३१० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला तो जप्त करण्यात आला आहे.