पुणे: पण कार्ड अपडेट करून देतो असे सांगून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर परिसरात राहणाऱ्या तानाजी शिवाजी वाकसे (वय - ४०) यांनी बुधवारी (दि. २०) पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ३० ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास घडला आहे. तक्रारदार यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तुमचे पॅनकार्ड अपडेट नाही. ते अपडेट करणे महत्वाचे आहे असे सांगितले. तक्रारदार यांनी पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी सहमती दर्शवल्यावर त्यांना लिंक पाठवून एक ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. अप्लिकेशन डाउनलोड केल्यावर आरोपींना तक्रारदार यांच्या मोबाईलचा संपूर्ण रिमोट ऍक्सेस मिळाला. त्यानंतर तक्रारदार यांच्या खासगी माहितीचा वापर करून, त्यांच्याकडून ओटीपी घेतला. त्यानंतर फिर्यादींच्या बँक खात्यातून तब्बल ६ लाख ४० हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.