-------------
राज्यातील ६० लाख मजुरांना संघटित करणार
महाराष्ट्र बांधकाम मजूर युनियन : न्यायासाठी लढण्याचा निर्धार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मजूर अड्डा तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या ६० लाख मजुरांना संघटित करण्याचा निर्धार महाराष्ट्र बांधकाम मजूर युनियनने जाहीर केला.
युनियनचे अध्यक्ष परमेश्वर जाधव यांनी सांगितले की, मजूर अड्ड्यावर रोज उभे राहून काम मागणारे, तसेच सुरक्षेची कोणतीही हमी नसताना बांधकामांवर धोक्याची कामे करणारे राज्यात तब्बल ६० लाख मजूर आहेत. सरकार दफ्तरी ही नोंद फक्त १४ लाख आहे. हे सर्व कामगार असंघटित आहेत. त्यामुळेच अपघातात ते बळी गेले तरी जुजबी नुकसानभरपाई व कोरडी सहानुभूतीशिवाय त्यांना काहीही मिळत नाही.
त्यांना घरे नाहीत, कामाची शाश्वती नाही, इतर कामगारांना मिळणाऱ्या कोणत्याही सुविधा त्यांंना मिळत नाहीत. या सर्व गोष्टींविरोधात यापुढे युनियनच्या माध्यमातून संघटित आवाज उठवला जाईल, असे जाधव यांनी सांगितले. या कामगारांंना ३६५ दिवस कामाची हमी द्यावी, काम देऊ शकत नसणाऱ्यांना बेरोजगारी भत्ता द्यावा, त्यांच्या मुलांंच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी, किमान ५०० चौरस फुटांची घरे त्यांना उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या युनियनच्या माध्यमातून सरकारकडे करत असल्याची माहिती जाधव यांनी दिली.