शिरूर : मांडवगण फराटा येथील जुना मळा येथे २० फूट बोअरवेलच्या खड्ड्यात सहा वर्षे वयाचा सुनील हरिदास मोरे हा मुलगा पडल्याची घटना शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. स्थानिक जेसीबी यंत्रणेने त्वरित समांतर खड्ड्यासाठी काम सुरू केले. यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू यंत्रणा हाती घेतली. मात्र, खडक लागल्याने रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. मूळ पाटोदा-वरूड (ता. जामखेड) येथील रहिवासी असलेले मोरे कुटुंब मांडवगण येथील राजाराम शितोळे यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासून शेतमजूर म्हणून काम करीत आहे. मंगळवारी सुनीलची आजी तुळसाबाई सावळा मोरे या शेतात कामासाठी गेल्या असता सुनीलही त्यांच्या मागे गेला होता. शेताच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत सुनील आपल्या मित्रांसमवेत खेळत होता. खेळता खेळता सुनील काल (दि. २९) खोदण्यात आलेल्या बोअरवेलमध्ये पडला. हा प्रकार लगेच त्याच्या मित्रांनी आजीला सांगितला. यावर भेदरलेल्या आजीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. शेतीमालक शितोळे यांना हा प्रकार सांगितला. शितोळे यांनी १०० क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला. तसेच ग्रामस्थांनाही पाचारण केले.ग्रामस्थांनी दोन जेसीबी उपलब्ध करून दिले. सुनील यास आॅक्सिजन कमी पडू नये, म्हणून मांडवगण येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या मदतीने तातडीने आॅक्सिजन सिलिंडरद्वारे आॅक्सिजन पुरवण्यात आले. मांडवणग प्राथमिक आरोग्य केंद्र, १०८ रुग्णवाहिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार राजेंद्र पोळ, नायब तहसीलदार गीतांजली गरड, पोलीस निरिक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. जेसीबीच्या साहाय्याने समांतर खड्डा खोदण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले. दुपारी २ वाजता एमडीआरएसचे जवान पुण्याहून घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी रेस्क्यू मोहीम हाती घेतली. रात्री आठ वाजेपर्यंत समांतर खड्डा घेण्याचे काम सुरू होते. एमडीआरएसचे जवान बोअरवेलमध्ये मुलाला धीर देण्याचा प्रयत्न करीत होते. यादरम्यानच्या कालावधीत सिलिंडरच्याद्वारे बोअरवेलमध्ये आॅक्सिजन सोडण्याचे काम सुरूच होते. मात्र, खडक लागल्याने त्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. (वार्ताहर)आजी मला वाचव..खेळत असताना सुनील बोअरच्या खड्ड्यात पडला. जिवाच्या आकांताने तो ‘आज्जी मला वाचव’ ओरडू लागता, आपला नातू दिसत नसल्याने आजीही सैरभैर झाली. संपूर्ण कुटुंब त्याच्या शोधात होते. त्याच्या आर्त हाकेने तो बोअरच्या खड्ड्यात पडला असल्याचे त्यांना कळाले. त्यांनी लगेच त्याला बाहेर काढण्यासाठी तसेच मदतीसाठी धावपळ सुरू केली.
बोअरवेलच्या खड्ड्यात अडकला ६ वर्षांचा बालक
By admin | Published: May 01, 2016 2:54 AM