पिंपरी : अचानक लागलेल्या आगीत ६० ते ७० दुचाकी खाक झाल्या. सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे सोमवारी (दि. ४) दुपारी चारनंतर ही घटना घडली. विविध कारवायांमध्ये सांगवीपोलिसांनी या दुचाकी जप्त केल्या होत्या. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपघातग्रस्त दुचाकी तसेच जप्त केलेल्या दुचाकी पीडब्ल्यूडी मैदानात ठेवण्यात येतात. सोमवारी दुपारी चारनंतर अचानक आग लागून या दुचाकींनी पेट घेतला. ही बाब निदर्शनास येताच काही नागरिकांनी पोलीस तसेच महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य अग्निशामक केंद्राला माहिती दिली. त्यानंतर मुख्य केंद्र तसेच रहाटणी केंद्रातील अग्निशामकचे दाेन बंब घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, वाळलेले गवत, दुचाकीचे टायर, सिटकव्हर, फोम यामुळे धुराचे मोठे लोट उठले. तसेच दुचाकींमधील पेट्रोल व ऑईलमुळे स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. त्यामुळे येथे मोठी गर्दी झाली. अग्निशामक दलाचे एक अधिकारी व अकरा कर्मचारी अशा १२ जवानांनी साडेपाचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले.
सांगवी पोलीस ठाण्याच्या जप्त केलेल्या अशा दुचाकी आगीत खाक होण्याची घटना डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात घडली होती. या घटनेला १५ दिवस होत नाहीत तोवर सोमवारी पुन्हा दुचाकी आगीत खाक झाल्याचा प्रकार घडला. दोन्ही घटनांमधील आगीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसेच यामागे कोणाचा हात आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.