पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील ६० टक्के कर्मचाऱ्यांच्या शरीरात ‘अॅन्टीबॉडी’ आढळून आल्या आहेत. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने (एनआयव्ही) हा ‘सिरो सर्व्हे’ केला असून बहुतांश कर्मचाऱ्यांना लागण झाल्यानंतरही कोरोनाची लक्षणे दिसली नसल्याचेही समोर आले.
एनआयव्हीकडून पोलीस, महापालिका, आरोग्य विभाग आदी अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. मागील आठवड्यात पालिकेच्या मुख्य इमारतीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या.
या चाचण्यांचे निष्कर्ष ‘एनआयव्ही’कडून पालिकेला कळविण्यात आले आहेत. एकूण ३०० कर्मचाऱ्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचे संकलन करण्यात आले होते. यातील ६० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये ‘अॅन्टीबॉडीज’ विकसीत झाल्याचे दिसून आले. या सर्वांना कोरोना होऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, यातील बहुतांश जणांनी कोरोना झाल्याचे त्यांना समजलेही नसल्याचे सांगितले.