सोमेश्वरनगर : जिल्ह्यातील ११ सहकारी व ५ खासगी साखर कारखान्यांनी मिळून ७० टक्के ऊसगाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. येणाऱ्या दोन महिन्यांत उर्वरित ३० टक्के ऊसगाळपासाठी कारखान्यांची धुराडी रात्रंदिवस धडधडत आहेत. आत्तापर्यंत कारखान्यांनी मिळून ६० लाख ६० हजार ३८ टन उसाचे गाळप करून, ६६ लाख ४ हजार ६०५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांपुढे चालू हंगामात ९० लाख टन ऊसगाळपाचा अंदाज होता. त्यापैकी सर्व कारखान्यांनी मिळून ६० मे. टनाचे गाळप केले आहे. मात्र, सहकारातील तज्ज्ञांनी ९० लाख टनाचा केलेला अंदाज हा पाण्याच्या कमतरतेअभावी ८० लाख टनावर येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अजून २० लाख टन ऊस शेतात उभा आहे. धरणक्षेत्रातही पावसाचे प्रमाणे अत्यल्प आहे. मात्र, आतापर्यंत सुरू असलेले कालवे बंद झाले आहेत. मात्र, अनेक कारखान्यांनी पाण्याची सोय केली आहे. छोटे मोठे साठवण तलाव बांधले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे गाळप पूर्ण करतील. ऊसगाळपात आणि साखर उताऱ्यात खासगी कारखान्यांनी बाजी मारली आहे, तर ९० टक्के २६५ उसाचे गाळप करून सोमेश्वर कारखान्याने सहकारी साखर कारखान्यात साखर उताऱ्यात बाजी मारली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी थंडी अधिक काळ टिकल्याने कारखान्यांना अजूनही साखर उतारे चांगले आहेत. नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान समजल्या जाणाऱ्या ‘हाय रिकव्हरी पिरीयड’मध्ये जिल्ह्यातील १२ कारखाने साखर उताऱ्यात ११ टक्क्यांच्या पुढे गेले आहेत. चालू हंगामात अनेक कारखान्यांपुढे दुष्काळाचे सावट उभे आहे. त्यामुळे पाण्याच्या कमतरतेअभावी उसाचे गाळप लवकर संपविणे हे कारखान्यांपुढे मोठे संकट आहे.दुष्काळी भागातील ऊस संपविण्यासाठी शेतकी विभाग यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिरायती भगाातील ऊस संपविण्यासाठी संचालक मंडळाने परवानगी दिल्या आहेत.
जिल्ह्यात ६० लाख ६० हजार टन उसाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2016 12:41 AM