पुणे: राज्यात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे रब्बी पिकाच्या पेरणीवर परिणाम झाला असून जानेवारी महिना अखेरपर्यंत राज्यातील रब्बी पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ ६० टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली आहे.त्यात रब्बी ज्वारी पिक वाढीच्या,पोटरी ते दाणे भरणेच्या अवस्थेत,गहू पिक फुटवे फुटणे ते ओंबीच्या अवस्थेत तर करडई पीक फुलोरा, बोंडे धरणे आणि काही ठिकाणे बोंडे पक्वतेच्या अवस्थेत आहेत.मात्र,पावसा आभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बहुतांश पिकांच्या उत्पादनामध्ये घट होणार आहे,असा अहवाल कृषी विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आला आहे.राज्याच्या कृषी विभागातर्फे जानेवारी अखेरपर्यंतचा पीक पेरणी परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात रब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून आत्तापर्यंत ३३.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामुळे राज्यात जानेवारी अखेरपर्यंत (दि.25) ६० टक्के रब्बीच्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात मका,ज्वारी पिकावर लष्कर अळीचा प्रादूर्भाव असून एकट्या सातारा जिल्ह्यात ३०३ हेक्टर क्षेत्रावर मका पिकावर आणि ४४.८ हेक्टर क्षेत्रावर लष्कर अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात ऊस पिकावर १४ हजार १११ हेक्टर क्षेत्रावर हुमणी किडीचा प्रादूर्भाव दिसून आला आहे.राज्यात कोकण विभागात ९४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असून उन्हाळी भात व भुईमुग पिकांकरीता जमिनीच्या पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत. तसेच विभागात काही ठिकाणी उन्हाळी भात रोपवाटीका तयार करण्याची कामे केली जात आहेत. नाशिक विभागात आत्तापर्यंत ५६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून हरभरा पिकावर घाटे अळी या किडीचा व मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. तसेच कोल्हापूर विभागात ७१ टक्के क्षेत्रावर ,लातूरमध्ये ७० टक्के,अमरावती विभागात ८८ तर नागपूर विभागात ९१ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात सर्वात कमी २.६८ लाखे हेक्टर म्हणजेच केवळ ३५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असल्याचे कृषी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
...............
पुणे विभागात रब्बी पिकाखालील सरासरी क्षेत्र १७.८३ लाखे हेक्टर असून २५ जानेवारी अखेरपर्यंत ७.७७ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यामुळे विभागात केवळ ४४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली. त्याचप्रमाणे परतीच्या पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे जमिनीतील ओलाख्या आभावा जिरायत पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून पिके सुकू लागली आहेत.त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.