वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्याला पहिल्यांदाच दोन तहसीलदार मिळाले आहेत. मावळ तालुक्यात १९० गावे आहेत. त्याचा भार एकाच तहसीलदारावर येत असल्याने तालुक्यातील ६० गावांसाठी अपर तहसीलदार अजित दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांची कामे जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
तहसील कार्यालयाची स्थापना झाल्यापासून मावळ तहसील कार्यालयात एक तहसीलदार व दोन ते तीन नायब तहसीलदार आत्तापर्यंत कार्यरत होते. आता मावळ तहसील कार्यालयात नव्यानेच अपर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अजित दिवटे यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी तत्कालीन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांचा कार्यकाल संपल्याने त्यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी विक्रम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
६० गावांसाठी नवा कारभारी
मावळ तालुक्यात १९० गावे असून वतन, कुळकायदा, निवडणुका, जमीन वादाच्या केसेस व इतर महसुली कामे तहसील कार्यालयात चालतात. अपर तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे १९० गावांपैकी काले काॅलनी व शिवणे मंडल विभागातील ६० गावांचा महसुली कारभार असणार आहे. दोन तहसील झाल्याने नागरिकांची कामे देखील जलद गतीने येत्या काळात होण्यास मदत होणार आहे.
राज्य शासनाने मावळ अपर तहसीलदारपदी अजित दिवटे, मुळशी अपर तहसीलदारपदी प्रियांका मिसाळ, खेड अपर तहसीलदारपदी नेहा शिंदे, दौंड अपर तहसीलदारपदी शाम चेपटे यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त्या केल्याने मावळ तालुक्यातील नागरिकांची कामे देखील जलद गतीने येत्या काळात होण्यास मदत होणार आहे.