'माझ्यासह ६०० ते ७०० भारतीय विद्यार्थी रुमानीयातील शल्टर हाऊसमध्ये सुरक्षित', विद्यार्थिनीने सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 08:59 PM2022-03-01T20:59:39+5:302022-03-01T20:59:54+5:30
रशिया - युक्रेन युध्दामध्ये एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने पुणे जिल्ह्यातील पालकांची धास्ती वाढली
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : रशिया - युक्रेन युध्दामध्ये एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने पुणे जिल्ह्यातील पालकांची धास्ती वाढली. याबाबत पुणे जिल्ह्यातील युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी लोकमतने संपर्क केला असता, आम्ही दोन दिवसापर्वी युक्रेनमधून रुमानीयातील शल्टर हाऊसमध्ये आलो असून, सुरक्षित असल्याचे पुण्यातील जुन्नर तालुक्यातील मंदिरा खत्री या मेडिकलच्या विद्यार्थिनीने सांगितले. युक्रेनमध्ये अडकलेलो आम्ही सुमारे ६०० ते ७०० विद्यार्थी सध्या रुमानीयातील शल्टर हाऊसमध्ये सुरक्षित असून, भारत सरकारकडून विमानाची सोय केली जाणार असल्याचे सांगण्यात आल्याचे खत्री हिने सांगितले.
पुणे जिल्ह्यातील सुमारे २५ ते ३० विद्यार्थी युक्रेन येथील विनितसिया नॅशनल पिरोगोव्ह मेडिकल युनिव्हर्सिटीत मेडिकल शिक्षण घेत आहेत. यामध्ये खत्री हिचा देखील समावेश आहे. युक्रेन येथील परिस्थिती बद्दल सांगताना मंदिराने सांगितले की, तीन-चार दिवसापूर्वी युक्रेनमधून बाहेर पडण्याबाबत प्रचंड अनिश्चिता होती. भारतीय दूतावासाकडून कोणत्याही प्रकारे सहकार्य केले जात नव्हते. परंतु यासंदर्भातील वृत्त विविध माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र दखल घेतली गेली व आम्हाला रुमानीयात घेऊन जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली. सध्या माझ्यासह सुमारे ६०० ते ७०० भारतीय विद्यार्थी रुमानीयातील 6 विविध शल्टरमध्ये सुरक्षित असून, जेवण- राहण्याची सोय केली आहे.